पोपटी २०२७ साठी लवकरच नोंदणी सुरु करणार आहोत.
नमस्कार!
नाशिकच्या ऐतिहासिक भूमीतील ‘पेठे विद्यालय’ ही केवळ आमची शाळा नव्हती, तर ते आमच्या आयुष्याला पैलू पाडणारे एक संस्कार केंद्र होते. १९८९ साली दहावीच्या उंबरठ्यावरून बाहेर पडताना, प्रत्येकाच्या डोळ्यात नवी स्वप्ने होती. आज मागे वळून पाहताना अभिमानाने ऊर भरून येतो की, तब्बल ३७ वर्षांनंतरही आम्ही २०० हून अधिक मित्र एका अतूट धाग्याने जोडले गेलो आहोत.
आमची मैत्री ही तंत्रज्ञानावर अवलंबून नव्हती. फेसबुक-व्हॉट्सॲपच्याही आधी, नाशिकच्या गल्ल्यांमध्ये आम्ही एकमेकांना भेटत होतो. पुढे 'ऑर्कुट' आले आणि आता 'व्हॉट्सॲप'च्या माध्यमातून आम्ही सातासमुद्रापार असलेल्या मित्रांनाही जवळ आणले आहे. पण आमच्यासाठी तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे, साध्य तर एकमेकांचे प्रेम आणि ओढ हेच आहे.
२०१७ मध्ये आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा शाळेच्या आवारात पाऊल ठेवले. केवळ आठवणींना उजाळा न देता, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासारखे उपक्रम राबवून आम्ही शाळेप्रती आपले ऋण व्यक्त केले. शाळेला जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा या समुहातील प्रत्येक हाताने हिरीरीने मदत केली आहे. आमची ही मैत्री केवळ मौजमजेपुरती मर्यादित नाही; 'देवदूत निधी' च्या माध्यमातून आम्ही संकटात असलेल्या मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो, हीच आमच्या समुहाची खरी ताकद आहे.
काळाराम मंदिरातील पारंपरिक वेषात साजरी होणारी दिवाळी असो, नाशिकची प्रसिद्ध 'मिसळ पार्टी' असो किंवा जानेवारीत रंगणारी 'पोपटी'ची मेजवानी; प्रत्येक भेटीत आम्ही पुन्हा एकदा शाळेतले तेच खोडकर विद्यार्थी होतो. आमच्या गेट-टुगेदरमध्ये केवळ आम्हीच नाही, तर आमचे परिवार आणि आमची पुढची पिढीही तितक्याच उत्साहाने सामील होते.
आमच्या समुहात आज कोणी मोठ्या हॉस्पिटलचे संचालक आहेत, कोणी चार्टर्ड विमानांच्या कंपनीचे मालक, तर कोणी हायकोर्टातील महाधिवक्ता! अनेक मित्र परदेशात स्थायिक आहेत तर अनेक जण यशस्वी उद्योजक म्हणून नाशिकमध्ये नाव कमावत आहेत. हुद्दा कोणताही असो, पेठे विद्यालयाचे आम्ही '१९८९ चे विद्यार्थी' ही ओळख आमच्यासाठी सर्वात मोठी आहे.
आमच्यातील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही वेबसाईट आकारास आली आहे. येथे मित्रांनी लिहिलेले लेख, कविता आणि काढलेली चित्रे असतील. सोबतच जुन्या-नव्या आठवणींचा खजिना, छायाचित्रे आणि मित्रांची डिरेक्टरी देखील उपलब्ध असेल. दहा ते बारा वर्षांपूर्वी आपण मित्रांनी ‘मैत्र ८९’ ब्लॉग तयार केला होता. त्याची लिंक देखील या नविन वेबसाईटवर ‘संग्रहीत’ नावाने जोडली आहे.
हे केवळ एक पोर्टल नसून, आपल्या मैत्रीचे एक 'डिजिटल घर' आहे. चला तर मग, या घराचे कोपरे आठवणींनी आणि सृजनशीलतेने सजवूया!
आपलाच,
मैत्र ८९ समुह
(पेठे विद्यालय, नाशिक)
समुहातील सदस्यांनी लिहीलेल्या लेख, कवितांचे हे सदर आहे. अवश्य भेट द्या.