लहानपण हा एक मंतरलेला काळ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. जसं आपण शाळेत जायला लागतो तसे घरातल्या आईबाबा अन भावंडांच्या प्रभावापासून थोडे दूर जातो आणि स्वतः चं एक वेगळं जग आकार घेऊ लागतं. ह्या काळात आपण सगळ्यात जास्त आपल्या शाळासोबती मित्रांच्या सांनिध्यात त्यांच्या सोबत असतो. ह्या आपल्या मित्रांसोबत आपण आपल्या सगळ्या सुखदुःखाचे वाटेकरी असतो. पण शाळा संपते आणि हे मित्र दुरावतात. मनाच्या एका कोपऱ्यात ह्या आठवणी तशाच राहतात. त्या काही विरत नाहीत.
शाळेनंतर आयुष्याच्या पुढच्या करिअरच्या टप्प्यात आपण घडत जातो परंतु लहानपणीचा शाळेतल्या मित्रांसोबतचा काळ आपल्याला खुणावत राहतो.
केव्हा माहितीये?
जेव्हा घटना, परिस्थिती, प्रसंग, माणसं आपल्या विपरीत होतात; समाजात वावरतांना स्पर्धा, ईर्षा, द्वेष, मत्सर, तिरस्कार अशा विविध कटू प्रसंगांना सामोरे जावे लागते. ह्यातून आपल्या मनांत उठणारी वादळं जीवन अंतर्बाह्य हेलावून टाकतात. तेव्हा मनात संत तुकारामांच्या ह्या ओळी आवर्जून आठवतात
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ध्रु॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ १॥
जया अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥ २॥
तुका म्हणे जाण । व्हावें लहानाहुनि लहान॥ ३॥
ह्या अभंगातली सगळ्यात शेवटची ओळ माझ्या मते जीवनाचे मर्म सांगणारी आहे. तुका म्हणे जाण व्हावें लहानाहुनि लहान.
आयुष्यात व्यावहारिक जगात येणाऱ्या अनुभवांमुळे सारखं वाटत असतं लहानपणी ह्याच जगात येणारे अनुभव वेगळे का होते? त्यावेळी स्पर्धा, ईर्षा, द्वेष, मत्सर, तिरस्कार असे काही जगात नव्हते का? अन मग विचार केल्यावर लक्षात येतं की तेव्हा आपल्या सभोवतालचं जग वेगळं होतं, तेव्हाचे मित्र एकमेकांना साथ देणारे, सोबत करणारे होते. आपल्याला एखादी गोष्ट, खेळ वा अभ्यासाचा विषय येत नसेल तर शिकवणारे आणि त्याबद्दल माहिती देणारे मित्र होते. पण आता प्रश्न हा होता की ह्या वयात हे लहानपण अनुभवायचे कसे?
आमचे पेठे विद्यालय, नाशिक ह्या शाळेतले १९८९ साली दहावी झालेले काही मित्र एकमेकांच्या संपर्कात होते त्यांनी एकत्र यायचे ठरवले आणि एके दिवशी संध्याकाळी सगळे एकत्र जमले, एकत्र जेवले खूप मजा केली. मग या भेटी वाढत गेल्या. ओरकूट वर एक ग्रुप तयार झाला, पुढे फेसबुक वर आम्हा मित्रांचा समूह बनला आणि जसे अँड्रॉइड फोन आले तसा व्हाट्सअप ग्रुप मैत्र ८९ तयार झाला तो आजतागायत आहे. ह्या बालमित्रांमध्ये वावरतांना आयुष्यातील सगळ्या Negative feelings विसरायला झालं. ह्या जगात वैयक्तिकरित्या लौकिकार्थाने काहीच नव्हतो तेव्हापासून आपल्याला ओळखणाऱ्या या मित्रांचे आपल्या आयुष्यात वेगळेच स्थान आहे हे जाणवले. अशा मित्रांसोबत आपण 'Selfless' असल्याचा अनुभव आला. ज्या ठिकाणी आपण Selfless होतो ती जागा जीवनात अतिशय पवित्र, प्रेरक आणि पोषक असते हे प्रकर्षाने समजले. मैत्र-८९ हा माझ्यासाठी केवळ एक Whatsapp group नाही. इथे मित्रांशी जो संवाद होतो त्यातून मिळणारा निखळ आनंद हा माझी जीवनप्रेरणा आहे आणि म्हणूनच मैत्र हा माझा श्वास आहे!
ह्या सर्व शाळांसोबतींबरोबर असताना स्वतःला विसरायला होतं. वय, काळ, स्थळ विसरून सगळे जण एका वेगळ्याच आनंदी जगात वावरतात. ह्या शाळा मित्रांची सोबत फक्त शाळेपुरती न राहता कायमची आहे हे जाणवते.
मैत्र ८९ च्या विविध उपक्रमातून ही मैत्रीची वीण अजून घट्ट होते आहे. कधी कधी थोडे मतभेद, भांडणे होतात मात्र चहाच्या कपातल्या वादळाप्रमाणे ती विरून जातात. आमच्या ग्रुपचा बल्लव रुपेश राजवाडे पोपटी नावाचा एक भन्नाट पदार्थ स्वतः बनवतो आणि सगळ्यांना अतिशय प्रेमाने खाऊ घालतो. हा पोपटीचा वार्षिक कार्यक्रम दरवर्षी साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये आमचा ग्रुप साजरा करतो. तेव्हा सगळे मित्र आवर्जून उपस्थित राहतात. तेव्हा जो काही निखळ आनंद सगळे मिळवतात तो तब्बल वर्षभर टिकतो.
आज आपल्या ग्रुपमधील प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात वावरतोय. काहीजण तर यशाच्या उत्तुंग शिखरावर आहेत. त्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत पण इथे मैत्र ८९ मध्ये शाळांसोबतींबरोबर एकत्र येऊन मुंगी साखरेचा रवा चाखण्याची गोडी काही वेगळीच आहे हे ते सुद्धा जाणतात आणि म्हणूनच ग्रुपच्या एखाद्या तरी कार्यक्रमाला जरूर येतात.
इथे मैत्र ८९ मध्ये लहानाहून लहान होण्यात कोणाला काही वावगं वाटत नाही. मोठ्या वयात लहानपणीचा अनुभव फक्त आपले शाळासोबतीच देऊ शकतात. या अहंकार विरहित मनस्थितीचा आनंद सगळे आमचे मित्र प्रत्येक एकत्रीकरणाला घेतात. आपल्या सगळ्या बालमित्रांना भेटण्याची ओढ आमच्यातील प्रत्येकाला आहे म्हणूनच त्या रामरायाला एकच मागणं आहे,
लहानपण देगा देवा......
-मधुशालिमिलिंद