मित्रांनो, तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, काही लोकांकडे खूप काम करूनही वेळ शिल्लक राहतो आणि काही लोकांना वेळच पुरत नाही आणि त्यांची धावपळ काही केल्या थांबत नाही. वर सांगितलेल्या दोन्ही कॅटेगरीच्या लोकांकडे समान कामं असतात, पण पहिली कॅटेगरी जी आहे, त्या लोकांना वेळेचे महत्त्व कळलेले असते आणि वेळेचे नियोजन ते उत्तम प्रकारे करू शकतात. मला असं वाटतं, वेळ हा आपल्याकडे असलेला सगळ्यात महत्त्वाचा आणि महाग स्त्रोत आहे, त्यामुळे तो अमूल्य आहे आणि त्याचा वापर योग्य करायचा, का तो वाया घालवायचा हे आपल्याला ठरवायला लागतं आणि वेळेचे व्यवस्थापन हा जितका सोपा विषय आहे, तितकाच तो अमलात आणण्यासाठी अवघड आहे. आपल्याला वेळेचे व्यवस्थापन का करावे लागते?
वेळ वाचवण्यासाठी
आपला ताण कमी करण्यासाठी
हाती घेतलेल्या कार्यावर चांगला कंट्रोल ठेवण्यासाठी व त्यापासून चांगलं आउटपुट मिळवण्यासाठी.
वरील मुद्दे आपल्याला अचिव्ह करायचे असतील, तर आपल्याला काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतील.
आता चांगलं नियोजन करायचं असेल, तर तुमचा गोल हा मेजरेबल आणि क्लिअर असला पाहिजे, तसेच प्राधान्यक्रम ठरवताना कामाची विभागणी तुम्हाला 'महत्त्वाचे आणि तातडीचे', 'कमी तातडीचे पण महत्त्वाचे' आणि तिसरं 'महत्त्वाचे नाही आणि तातडीचे नाही' या पद्धतीने करणे गरजेचे आहे.
दिवसाच्या चोवीस तासांपैकी वर उल्लेख केल्याप्रमाणे जर आपण प्राधान्यक्रम ठरवला, तर मला निश्चित खात्री आहे, आपण सहज आपल्या कामाची डेडलाईन ठरवू शकतो, तसेच योग्य वेळी योग्य काम आपल्या हातून घडते आणि एखादं अनपेक्षित काम समोर उभं ठाकलं, तर त्याच्यासाठी आपल्या हाती वेळ शिल्लक असतो. 24 तासांपैकी साधारण बारा तास आपले कामात आणि आवरण्यात जातात, आठ तास विश्रांती घेण्यात जातात आणि उरलेले चार तास जे आहेत, त्याची विभागणी माझ्या मते खालीलप्रमाणे केल्यास त्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो.
चांगलं नियोजन
कामाची यादी आणि प्राधान्यक्रम ठरवणे
कामाची डेडलाईन ठरवणे
योग्य वेळी योग्य काम करणे
अनपेक्षित समोर आलेल्या कामांसाठी काही वेळ राखून ठेवणे
ओव्हर कमिटमेंट टाळणे
1. एक तास व्यायाम करणे
2. एक तास आपल्या आवडीच्या गोष्टी आणि छंद जोपासना याच्यासाठी वापरणे
3. एक तास स्वतःच्या फायनान्शिअल प्लॅनिंगसाठी वापरणे
4. आणि एक तास मित्र, कुटुंब व समाजासाठी देणे.
याचबरोबर आणखीन एक सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे, ती म्हणजे वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे किंवा वस्तू जिथून घेतली तेथेच परत ठेवणे. ही सवय वेळेच्या व्यवस्थापनाबरोबर जर एखाद्याने आत्मसात केली, तर त्याचे प्रचंड फायदे आहेत, जसं की तुम्हाला ती गोष्ट शोधण्यातला वेळ वाचणे, तुमचा ताण कमी होणे, इत्यादी. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा मला माझ्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रचंड फायदा झाला आहे.
मैत्र अंकासाठी हा विषय लिहितो आहे, तर माझ्या पन्नाशी पार झालेल्या मित्रांना काही गोष्टी सांगाव्या असं वाटतं, साधारण तीन-चार वर्षांपूर्वी कोरोना नावाचं भयानक वादळ आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येऊन गेलं आणि त्याने आपल्याला एक गोष्ट खूप चांगल्या रीतीने शिकवली, ती म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं नसेल, तर बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यात व्यर्थ आहेत आणि हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि पाहिलं सुद्धा, त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या व मी वर सांगितल्याप्रमाणे एक तास रोज व्यायामासाठी निश्चित काढा, तसेच आपल्या आवडीच्या गोष्टी आणि छंद यांच्यासाठी पण वेळ राखून ठेवा आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचे तास लवचिक ठेवाल आणि कामाचा स्वतःला ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घ्याल आणि तसं पाहिलं, तर हे फारसं अवघड नाहीये, कारण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर प्रत्येकावरच कौटुंबिक आणि इतर जबाबदारीचं ओझं हे बऱ्यापैकी कमी झालेलं असतं, फक्त आपल्याला एवढेच कळणं महत्त्वाचं आहे, ते आपण कुठे थांबायचं आहे. शेवटी इतकंच सांगेन की वेळेचे व्यवस्थापन जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जमलं, तर तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही.
DON'T SAY "there is still time " or" Maybe next time" Because there is also concept of... IT'S TOO LATE