धाक
खोटं बोलू नये "बाप्पा रागावतो", चोरी, फसवणूक करू नये " नरकात सुया टोचतात, तेलात उकळवतात" या पासून ते रस्त्यावर वाहन चालवताना सिग्नल तोडला तर "रु. १०००/-" दंड होतो. वगैरे वगैरे.
काय आहे हे? कशासाठी असावे? याची उत्सुकता आणि नंतर देव वगैरे काही नसतं, स्वर्ग-नरक हे थोतांड आहे, पोलीस कुठे आहे बघायला असा युक्तिवाद करत अयोग्य वर्तनाला खतपाणी घालतात. समाज कसा बदलत जातो नाही? किंबहुना आपण स्वतः पुरतं जरी बघितलं तरी जाणवतं. एखाद्या समूहाला मग ती संस्था असो वा देश कोणी तरी काही नियम लावायचा प्रयत्न करत असतो. उद्देश हाच की ज्या ध्येयाने एकत्र आहोत ते पार करण्यासाठी काय करायचे आणि काय नाही करायचे. सध्या आपण फक्त सकारात्मक उद्देश बघू या.
सामान्य ज्ञान, विवेकबुद्धी, संवेदनशीलता, सारासार विचार, गतकाळात घडलेल्या गोष्टी इ. इ. अनेक गोष्टींचा वापर करून ज्या ध्येयाकडे जायचे आहे त्याचे धोरण ठरवले जाते. त्यातून जे साध्य करायचे आहे त्याला शब्दबद्ध केले जाते. मग काय करायचे, ते कसे व केव्हा करायचे, कसे नोंदवायचे त्यासाठी कशाचा वापर करायचा हे ठरवले जाते. ही ठरवणारी माणसेच असतात. मग ठरते जबाबदारी. जबाबदारी पार पाडण्यासाठी येतात अधिकार. मग संघटनात्मक संरचना तयार होते. विभाग तयार होतात. या सगळ्याला नियमावली म्हणतात. या सगळ्याला धरून व्यक्तींच्या नेमणुका होतात आणि कार्य सुरु होते.
अपेक्षा अशी असते की ठराविक काळाने या सर्व प्रक्रियेचा धांडोळा घेत घेत काही आवश्यक बदल करावे, उजळ माथ्याने ज्याला "सुधारणा" म्हणता येईल आणि नक्कीच घसरण म्हंटले जाणार नाही. जर नसेल तर किमान जे आहे ते तो पर्यंत करत राहणे जोपर्यंत सुधारणा सुचत नाही. सुधारणा करताना ज्या यंत्रणेने हे सकारात्मक संघटन चालले आहे त्यावर अवाजवी टीका टाळावी हा संकेत आहे. अर्थात सगळं - म्हणजे ध्येय, ते साधण्यासाठी एकत्रित आलेले लोक आणि सुधारणा करू इच्छित असलेले लोक व प्रस्तावित सुधारणा हे सगळं चांगलं आहे असं गृहीत धरून केलेली टीका वाजवी असावी. आपलं योगदान कुठे, कधी, किती आहे याचे मूल्यमापन करून त्या प्रमाणात सहकार्य व टीका करावी.
तुम्हाला वाटेल की हे काय प्रवचन सुरु झाले, हेतू काय? सांगत ...तुम्ही हे कधी ऐकलं, बोललं, पाहिलं का? की आजकाल समाज विस्कळीत होतो आहे, माणसं, व्यक्ती, संघटना, देश यांच्या वर्तनात विचित्रपणा येतो आहे. पूर्वी सारखं आयुष्य साधं राहिलं नाही. काय ते दिवस होते पूर्वी वगैरे वगैरे.
आता काही गोष्टींचा साधा ऊहापोह.
१. सुमारे १९५० ते १९६० चे दशक एका तालूक्याला एक शिक्षक (गुरुजी) संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी फेर फटका मारायला घराबाहेर पडायचे. ज्या घराच्या पुढे पडवीत घरातील लहान मुले पाढे परवचा म्हणताना दिसणार नाही तिथे थांबायचे हाक मारायचे. मुले पालक "धाकाने" बाहेर यायचे पाढे परवचा सुरु व्हायचा. गुरुजी पुढे जायचे.
२. सुमारे १९८५ ते १९९० म्हणजे आपण शाळेत होतो तेव्हा शिक्षकांचा "धाक" वाटत असे. शिक्षकांनी रागावले तर घरी काय सांगायचे याचा "धाक" वाटत असे.
३. गल्लीत जाता येता एका ठराविक प्रमाणात बाहेर उद्दामपणा केला तर गल्लीतल्या काका मावशीच्या नजरेचा "धाक" वाटत असे.
४. आपल्या लहानपणी पोलीस हा तितकासा टिंगल टवाळीचा विषय नव्हता. आता सिग्नलवर पोलीस असो वा नसो सिग्नलचा "धाक" नसणारे लोक दिसतात.
५. वाहन विमा न काढणारे, रस्त्यावर कचरा टाकणारे, लोक विचारणा केली तर कसनुसे हसतात, वेळ प्रसंगी "धाक" वाटत असेल तर मानही खाली घालतात पण पुढील वेळी तेच करतात.
याला कारण काय आहे? धाक मनाचा असावा मग आपोआपच जनाचा वाटू लागतो. अन्यथा काल तू केले मग मी आज केले. म्हणजे वाल्मिकी ऋषींना आपण असे म्हणणार का की तुम्ही जितके वर्ष लूटमार केली तितके वर्ष आम्हीही करू मगच चांगल्या मार्गाला लागू. हे म्हणजे इतिहासातून काही न शिकण्यासारखे आहे. आपण सगळे परत "चाकाचा शोध" लावणार का?
म्हणून सामान्य ज्ञान, विवेकबुद्धी, संवेदनशीलता, सारासार विचार, गतकाळात घडलेल्या गोष्टी इत्यादींचा विचार करून समाज निर्माण करू यात ज्यात नैतिकतेचा "धाक" असेल. विविध संस्था, संघटना यात सर्व स्तरात निर्बुद्ध होयबा नसतील. प्रगती असेल पण सह-वेदना सहज जाणवतील. नियम आणि नियामक हे आपलेसे करू यात. अर्थात प्रश्न विचारायचा अधिकार आपल्याला निश्चितच वापरायचा आहे पण तो अभ्यासपूर्ण असू द्या जेणे करून समाज जागा राहील. नाहीतर अनिर्बंध सतत ही अनियमित व्यवहार करण्यास पूरक ठरते. सामान्य माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ह्याच विवंचना होत्या आणि पुढील ५० वर्ष राहतीलही. पण "धाक" पाळू या आणि "धाक" निर्माण करू या.