मुळात नाशिक हे तीर्थक्षेत्राचे गाव. वृत्तीने कर्मठ. त्यामुळे इथली खाद्यसंस्कृती विशेषत: बाहेरचे खाणे हे हळूहळू शहरीकरणामुळे वाढीस लागले. याची सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी खूण म्हणून मेनरोडवरील 'मंगेश मिठाई'कडे बघता येईल. माउंट अबूतून आलेल्या हलवायाने हे दुकान १८४० साली सुरू केले. खास नाशिकच्या असलेल्या खुर्चनवडीचा जन्म इथलाच. असे म्हणतात की हलवायाच्या मुलाने उरलेल्या पदार्थांमधून जसे रवा, बेसन, मावा एकत्र करून हा पदार्थ शोधला. खुर्चनवडीप्रमाणेच खास नाशिकमध्ये मिळणारे असे मोजकेच पदार्थ आहेत. पाव वडा (वडापाव नव्हे तर पावाचा वडा), कढी भेळ, रविवार कारंजावर मिळणारे आईस्क्रीम युक्त अननस सरबत आणि खास नाशिकमध्ये प्रचलित असणारी टक्कर!
आता काही मिसळप्रेमी (ह्या लेखाचे बहुतांश वाचक) मिसळीलासुद्धा ह्या यादीत स्थान देण्याचा आग्रह धरतील. परंतु नाशिकप्रमाणेच मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर अशी अनेक शहरं मिसळीवर आपला हक्क सांगतात.
खुर्चनवडी म्हटलं की बुधा हलवाई हे समीकरण पक्कं झालं आहे. अर्थात बुध्याची ओळख ही त्याच्या खास जिलबीमुळे! मूळचा नाशिककर बाहेर कुठेही गेला तरी जिलबी म्हटलं की त्याला बुधा हलवाई आठवतो. या जिलेबीचा उगम मात्र पर्शियन साम्राज्यातला म्हणजे इराण, सीरिया, लेबेनॉन, या भागातला. तिथे साधारण हजार वर्षांपूर्वीपासून ‘झोलबिया’ या पदार्थाचा उल्लेख आढळतो. पुढच्या काही शतकात व्यापारीमार्गाने हा पदार्थ आपल्याकडे आला आणि हळूहळू भारतभर पसरला. भारतात उत्तरेकडे विशेषतः पंजाब, दिल्ली आणि इंदोर इथे जलेबा (मोठी आणि जाड जिलेबी) हा प्रकार मिळतो. बऱ्याच ठिकाणी यावर रबडी टाकून खाल्ली जाते. इंदोरचा सराफा किंवा दिल्लीचा चांदणी चौक परिसर ह्यासाठी प्रसिद्ध आहे. शिमल्यात जिलबी ही गरम दुधात टाकून दिली जाते. तिथे दूध-जिलेबी हे प्रसिद्ध हिवाळी स्ट्रीटफूड आहे. गुजरातमध्ये 'जलेबी अने फाफडा' हे कॉम्बिनेशन प्रचलित आहे तर दक्षिणेत इमरती किंवा जांगिरी (स्थानिक नाव) नावाचा गोड पदार्थ सण किंवा लग्नात आवडीने खाल्ला जातो. बंगालमधील छेना जिलेबी ही जिलबी आणि रसगुल्ला यांचा संगम वाटतो. इथे पिठाऐवजी दूध फाडून केलेला छेना वापरला जातो.
वडापावचा उगम मुंबईचा. नेमकं सांगायचं तर दादर स्टेशन बाहेरचा. पण नाशिककरांनी मात्र थेट पावालाच डाळीच्या पिठात बुडवून कढईत सोडायला सुरुवात केली आणि पाववड्याचा जन्म झाला. हल्ली यात थोडी बटाट्याची भाजी पण भरली जाते. आता वडा जर साबुदाण्याचा असेल तर उत्कृष्ट चवीचे साबुदाणा वडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे दादरमध्ये प्रकाश किंवा आस्वाद, पुण्यात प्रभा आणि नाशिकमध्ये सायंतारा. अर्थात वडे खाल्ल्यानंतर उरलेली किंवा मुद्दामून आणखी घेतलेली पातळ चटणी प्लास्टिकच्या प्लेटमधून पिण्याचे सुख फक्त नाशिककरांना. या चटणीमुळे वड्यांना चव आहे आणि वड्यांमुळे चटणीला ओळख आहे. कढी-भेळ हे कॉम्बिनेशन सुद्धा फक्त नाशिकचंच! पूर्वी मेनरोडवर 'सुरती फरसाण'मध्ये हा पदार्थ मिळायचा. आता बऱ्याच ठिकाणी कढी-भेळेचं ब्रॅण्डिंग केलं जात आहे.
बाकी चिवडा, शेव, भत्ता हे प्रकार नाशकात फार पूर्वीपासून कोंडाजी, मकाजी आणि माधवजी हे नाशिक चिवड्याचे पिढीजात ब्रँड. नंतरच्या काळात सानप भेळभत्ता, शौकीन भेळ यांनी नाशिककरांच्या जिभेचे चोचले पुरवले. चिवड्यापासून भेळ ही उत्क्रांती ठीक आहे परंतु त्यात पुढे रस्सा टाकून मिसळ करण्याचा मोह मात्र नाशिककरांनी आवरला. नाशिकमध्ये मिसळीचा बेस हा कायम 'मटकी उसळ' हाच राहिला आहे. बाकी मिसळीवर लिहायचं ठरवलं तर वेगळा विशेषांक काढावा लागेल आणि इथले सगळेच वाचक हौशी मिसळतज्ञ असल्याने तपशिलावर वादविवाद स्पर्धा घडवून आणता येतील. उदाहरणार्थ अंबिकाची क्वालिटी घसरली आहे का? 'ओम टी' का 'बाळासाहेब'? आधी 'श्यामसुंदर' आणि आता 'विहार' चालवणाऱ्या अण्णाची मिसळ भारी का श्यामसुंदरच? साधनाला लोक का जातात? इत्यादी इत्यादी.
पावभाजीचा जन्म मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या परिसरात झाला. १८५०च्या सुमारास उरलेल्या भाज्या मॅश करून त्यात मसाला व बटर टाकून गरमागरम भाजी तयार केली जात असे आणि ती पावाबरोबर दिली जाई. हळूहळू ही भाजी चौपाटी व रेल्वे स्थानकांवर प्रसिद्ध झाली आणि पुढे मुंबईची खासियत बनली. नाशिकमध्ये पावभाजी आली ती साधारण ६०-७० च्या दशकात. सुरुवातीला नेहरू गार्डन वगैरे परिसरात हातगाडीवर मिळणारी पावभाजी नंतर हळूहळू शानदार, कुलकर्णीज, मामाज इत्यादी हॉटेलमधून प्रतिष्ठा पाऊ लागली.
पंचवटी हॉटेल सुरू होणे हा नाशिकच्या खाद्यसंस्कृतीतला महत्त्वाचा टप्पा. त्याआधी सहकुटुंब बाहेर खायला जाणे म्हणजे सुरुची, गोकुळ किंवा अन्नपूर्णा इथली राईस प्लेट किंवा उडपी पदार्थ असे समीकरण होते. फारच सामिष खायचे असेल तर मात्र मुंबई नाक्याजवळचे 'प्रकाश'. पण पंचवटी हॉटेलमधल्या ढाबा रेस्टॉरंटमुळे नाशिककरांच्या बाहेर खाण्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या.
बेकरी कल्चर हे नाशिकमध्ये इंग्रजांपासून आहे. विशेषतः देवळाली कॅम्प या भागात फार पूर्वीपासून बेकरीज होत्या. तिथल्या रॉयल बेकरीचा ब्रून पाव किंवा मिलिटरी लोफ हे त्याकाळी प्रसिद्ध होते. नंतरच्या काळात आदर्श बेकरीचा मिल्क ब्रेड किंवा सँडविच ब्रेड हा नाशिककरांचा घरगुती खाद्यपदार्थ झाला. आदर्श बेकरीचा मिल्क ब्रेडसारखा ब्रेड बाहेर कुठेही मी तरी खाल्ला नाही. त्यावेळेला इतरही काही बेकरीज जसे तीळभांडेश्वर लेनमधील अशोक बेकरी, तेली गल्लीमधली श्री भैरवनाथ बेकरी, माझदा बेकरी इत्यादींनी नाशिककरांच्या दुपारच्या चहाबरोबरच्या मेनूची सोय केली. भद्रकाली भाजी बाजारासमोरील मार्केटमध्ये सुद्धा नानकटाई, बेकरी समोसा हे पदार्थ उत्तम मिळत असत. सर्कलला दुपारी इंग्लिश पिक्चर बघितल्यानंतर मित्रविहार जवळच्या माझदाचे खिमा किंवा व्हेज पॅटीस खाऊन मगच घरी जायची पद्धत होती. “आजची शिफारस: व्हेज पॅटीस” ही पाटी अनेकांना आठवत असेल.
७०-८० च्या दशकात नाशिकचा; मुळातच फारसा दम नसलेला उन्हाळा आणखीन सुसह्य करण्याचे काम गावातील काही रसवंतीगृहे, रविवार कारंजावरील अननस सरबत विकणारे आणि गंगेवरील कुल्फीवाले करीत असत. आईस्क्रीम खायला जाणे म्हणजे मेहेर जवळील 'गारवा'त जाणे. दुनियेत सगळीकडे पाईनापल ज्यूस मिळतो पण नाशिकचे 'आईस्क्रीम घालून केलेले अननस सरबत' हे जणू जिओग्राफिकल ट्रेडमार्कच आहे. आता यात पांडे लस्सीचा उल्लेख राहिला, पण मी तरी पांडे लस्सी ही फक्त उन्हाळ्यासोबत जोडणार नाही.
स्ट्रीट फूड नंतर चहा हा आलाच. शास्त्र असत ते! हा चहा तसा ५००० वर्षे जुना. मूळ चीनमध्ये Madarine या भाषेत चहाला नुसतेच ‘चा’ असे म्हणतात. चीनमधून सिल्करूटद्वारे जिथे जिथे चहा पसरला त्या सर्व देशांमध्ये (पर्शिया टर्की रशिया, आखाती देश) चाय, चा किंवा त्यांचे अपभ्रंश अशीच नावे चहाला आहेत. चहा समुद्रमार्गे जिथे गेला म्हणजे इंग्लंड स्पेन युरोपियन देश तिथे चहाला Te, Tea किंवा त्यांचे अपभ्रंश या पद्धतीची नावे आहेत. भारतात चहा हा इंग्रजांनी आणला हे पूर्णपणे खरे नाही. भारताच्या उत्तर पूर्व राज्यांमध्ये फार पूर्वीपासून चहा हा औषधी काढ्यासारखा प्यायला जातो. मात्र नाशिकमध्ये आलेला चहा हा निश्चितपणे इंग्रजांनी भारतात व्यापारीकरण केलेला चहा आहे. साधारण १९०० सालच्या सुमाराला आपल्याकडे चहा आला. नाशिकमध्ये मग आपण त्याची अर्धे दूध व अर्धे पाणी घालून टक्कर केली. बाकी ठिकाणी तुम्हाला चहा किंवा जास्त दुधाचा स्पेशल चहा मिळू शकतो. पण 'टक्कर' हा शब्द खास नाशिकचा ते सुद्धा एक टक्कर म्हणजे दोन कप किंवा दोन ग्लास चहा.
तर अशी ही नाशिकची खाद्यसंस्कृती. हवामान (द्राक्ष, वाइन), परंपरा (चिवडा), भूगोल (मुंबई, खानदेश आणि गुजरात मधून आलेले पदार्थ) अशा विविध घटकांची झकास मिसळ आहे.
- योगेश अकोलकर