मित्रांनो, 2013 साली एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आले, 'यू कॅन हील युवर लाइफ' आणि त्या दिवसापासून मला समजले की कोणताही आजार हा विचारांनी आपल्या शरीरात प्रवेश करतो. तसे पाहिले तर आपण जो आहार घेतो त्याने देखील आपण आजारी पडतो आणि काही औषध घेऊन तो तेवढ्यापुरता बराही होतो, पण त्याहीपेक्षा जास्त वेळी आपण जो विचार करतो त्याने जो आजार होतो तो कायमस्वरूपी होऊन त्याचे दुष्परिणाम शरीरावर दीर्घ काळापर्यंत होतात.
आता आपण बघूयात विचाराचे एक साधे उदाहरण. आपण शाळेत असताना मधल्या सुट्टीत लाल हिरव्या रंगाचे बोरे किंवा चिंचा घेऊन त्यावर मीठ लावून मित्रांसोबत खायचो, खूप मजा यायची. जसा हा प्रसंग आठवला तसे तुमच्या तोंडाला पाणी सुटले. तसेच अनेक वेळा आपण रात्री झोपेत एखादे भयानक स्वप्न बघितले की लगेच घाबरून किंवा दचकून उठतो, तेव्हा कधी कधी घामही आपल्याला येतो.
या वरील दोन्ही प्रसंगात आपण फक्त विचार करतो आणि आपले शरीर त्याला प्रतिसाद देते. याचाच अर्थ असा की तुमचे विचार हे देखील कोणत्याही आजाराचे प्रवेशद्वार असते.
आता आपण कोणकोणते विचार हे कशा प्रकारचे आजार शरीरात निर्माण करू शकतात हे जाणून घेऊयात.
बरेच वेळा आपल्या आजूबाजूची लोकं आपल्याला कोणाबद्दल तरी येऊन बरे वाईट, जे त्यांना आलेले अनुभव किंवा कोणीतरी त्यांना सांगितलेले त्या व्यक्तीबद्दल बोलतात, की ज्याला आपण गॉसिप असे म्हणतो. पण यालाच त्याच्या डोक्यातील कचरा तुमच्या डोक्यात टाकणे आणि अशा खूप साऱ्या घंटागाड्या आपल्या आजूबाजूला दिसतात की ज्या आपली पण घंटागाडी बनवून टाकतात. याच कचऱ्याचा नंतर दुर्गंधी घेऊन आपण फिरत असतो. हे झाले लोकांनी टाकलेल्या कचऱ्याबद्दल, पण आपण देखील आपल्याला आलेल्या मानापमानांच्या गोष्टी, एखाद्याबद्दल आलेला अनुभव मनात कायम साठवून ठेवतो आणि त्याचेच रूपांतर नंतर ॲसिडिटीच्या रूपाने आपल्याच शरीरावर परिणाम करून दीर्घकाळ त्रास देते.
लहानपणी घडलेली एखादी वाईट घटना, जशी की जवळच्या ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला लैंगिक अत्याचार, की जो डोक्यात घृणा स्वरूपात कायमचा बसतो, किंवा कोणाकडून आपल्याला एवढा वाईट आत्मिक त्रास होतो की आपण अगदी आतून भावनिक दृष्ट्या तुटून जातो आणि मग तो पुढे जाऊन तोच कॅन्सरच्या स्वरूपाने जन्माला येतो आपल्याच शरीरात.
अजून एक अनुभव म्हणजे अचानक कमी वयात घरातील कर्ता व्यक्ती, कदाचित वडील जाणे आणि त्यामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी आपल्याकडे येणे किंवा वैचारिक दृष्ट्या ती आपल्यावर आली आहे असा समज होणे स्वाभाविक. या विचारातून पुढील वाटचाल सुरू होते आणि त्याचा परिणाम कायम 'खानदान दुःखी' सुरू होणे.
अचानक जॉब जाणे किंवा मोठा आर्थिक तोटा होणे आणि आता पुढे कसे काय होणार याची चिंता सतावणे, याचा परिणाम आपल्या बॅकबोनवर होऊन कमरेचा आजार शरीरावर होऊन कायमची पाठ किंवा कंबरदुखीचा आजार सुरू होतो.
अशीच परिस्थिती बरेच वेळा घरात आलेल्या नववधूवर म्हणजे सुनेवर झालेली दिसते, कारण ती एका वेगळ्या विश्वातून नवीन घरात येते आणि सासरच्या परंपरांचा एवढा भडिमार होतो की अचानक तिच्या मनात म्हणजेच विचारावर भावनिक दडपण येऊन तिला फ्रोझन शोल्डरसारखा आजार बळावतो, कारण तिला सर्व काही तिच्या इच्छेनुसार कामे करायची सवय असते, पण तिला तो फ्रीडम मिळत नाही आणि जे करायची इच्छा नसते ते तिला बळजबरीने करावे लागते. म्हणजेच याचा अर्थ असा की तिला तिच्या मूव्हमेंटवर बंध घालावा लागतो आणि त्याचा तिच्या शरीरावर परिणाम होतो.
बघा ना, जेवढे काही स्पेशलिस्ट डॉक्टर असतात ते खूप यशस्वी देखील असतात आणि त्यातून ते बरेच पैसे देखील कमावतात, परंतु सतत तोच तोच विचार करून आणि सतत त्याच रोग्यांमध्ये राहून तोच विचार करून बरेच वेळा त्याच आजाराने ते गेलेले असतात. उदाहरणच घ्यायचे तर डॉ. नितू माणके, यांच्याबद्दल काय लिहिणार, ते सर्वांनाच परिचित आहे.
मनात एखाद्या व्यक्तीबद्दल असलेली अढी ही आपल्या शरीरात एखाद्या गाठीचे अस्तित्व निर्माण करते, जसे की ट्यूमर किंवा रक्त वाहिनीमध्ये गाठ निर्माण होणे. मग ऑपरेशन किंवा एंजियोग्राफी करून ती काढावी लागते.
बरेच वेळा ज्यांना पैसे खर्च करताना खूप त्रास होतो म्हणजे पैसे असतात त्यांच्याकडे पण देताना मनापासून खर्च न करता अगदीच जीवावर आल्यासारखे होते, अशा लोकांना बद्धकोष्ठतेचा किंवा पाइल्सचा त्रास होतो आणि या मागचा विचार हा असतो की मी माझ्या स्वतःचे पैसे का खर्च करू? म्हणजेच की ते जाऊ न देणे हीच भावना आणि त्या मागील असलेला विचार वरील आजार शरीरात प्रवेश करतात. बरेच जण हे याच विचारांमुळे स्किन डिसीजला देखील सामोरे जातात…
तसेच सर्व काही सुरळीत चालू आहे, घर, गाडी, मुलांची लाइन लागली आहे अशा वेळी बरेचदा जीवनातील गोडवा चालला जातो आणि मग तो शुगरच्या स्वरूपात शरीरात प्रवेश करून आपण कायमचे डायबेटिक होऊन बसतो. भविष्याचे येणारे प्रश्न किंवा चिंता ही बीपीच्या म्हणजेच ब्लड प्रेशरच्या स्वरूपात येते आणि कायमची गोळी पाठीमागे लागते.
हे आणि असे सर्व प्रकारचे आजार हे इथे मी मांडू शकत नाही कारण शब्दांची मर्यादा आहे, म्हणून तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क करू शकता. माझ्या अनुभवातून जे शक्य आहे तेवढे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जरूर करणार आणि हो, सध्या तुमचे चालू असलेले उपचार आणि औषध हे चालू ठेवा, पण मी खाली काही उपाय सुचवत आहे ते एकीकडे चालू करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी खात्री देतो.
सर्वप्रथम एक कोरा कागद घेऊन त्यावर जे काही तुमच्या मनामध्ये जुन्या कटू आठवणी असतील, जसे की ज्या लोकांनी तुमचा कधी काळी भूतकाळात अपमान केला असेल त्या अगदी डिटेल्समध्ये जेवढ्या आठवतील त्या लिहून टाका आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तो कागद परत वाचू नका, त्याला जाळून टाका आणि त्या व्यक्तीला मनापासून माफ करून टाका. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे, कारण जो कचरा तुम्ही गोळा करून ठेवला होता तो कायमचा नष्ट होऊन जाईल आणि तुम्हाला रिलीफ मिळेल. तसेच जर तुम्ही कोणाला कळत नकळत दुखावले तर त्याच्याकडे जाऊन त्याची माफी मागा, अन्यथा त्याच्यातील तुमच्या विरोधात असलेला कचरा देखील सर्वत्र दुर्गंधी पसरवत राहील किंवा ती व्यक्ती तुमच्या संपर्कात नसेल किंवा या जगात नसेल तर अगदी मनापासून रोज रात्री झोपण्याआधी देवाकडे माफी मागा, 'जर आज माझ्याकडून चुकून कोणाला दुखावले गेले असेल तर मी त्यासाठी मनापासून माफी मागतो.' यालाच मेंटल डिटॉक्स असे म्हणतात.
दुसरा मुद्दा, आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मुल दडलेले आहे, ज्याला कधीकाळी खूप प्रेमाची गरज आणि सवय होती. पण जसजसे आपण मोठे झालो, ते मूल कुठेतरी दुर्लक्षित होत गेले. कारण जसजशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या, तसतसे आपण स्वतःवर प्रेम करणे सोडून दिले. आपल्या कुटुंबासाठी कामात इतके कष्ट घेतले की, मला स्वतःला काय आवडते ते देखील विसरून गेलो. यावर उपाय म्हणजे आधी स्वतःवर प्रेम करा, मस्तपैकी कधीतरी एकटेच बाहेर फिरायला जा, जे आवडेल ते स्वतःसाठी खरेदी करा, एखाद्या चांगल्या स्पा मध्ये जा, मोठ्या सलूनमध्ये जा, तेथे फेशियल, हेड मसाज करा आणि ठरवा की महिन्यातून एक दिवस तरी स्वतःसाठी असाच मजेत घालवा. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला आनंदाने म्हणा, *I love you श्रीकांत आणि मी खूप निरोगी तसेच नशीबवान आहे*. बघा कसे छान वाटते तुमच्या त्या आतील लहान मुलाला! तो आनंदी झाला की तुम्ही देखील प्रत्येक दिवस आनंदात साजरा करायला सुरुवात कराल, कारण जसा तुम्ही विचार करता तसे तुमच्या आयुष्यात घडते. यालाच सेल्फ लव्ह असे म्हणतात.
तिसरा मुद्दा, खरं तर आयुष्य (जीवन) म्हणजे काय, तर बरीच वेगळी-वेगळी उत्तरे लोकं सांगतात. खरं तर जे भूतकाळात घडून गेले ते आता काही बदलता येणार नाही आणि भविष्यात काय घडणार हे देखील सांगता येत नाही. तरीदेखील लोकं मनात चाललेल्या विचारात, आपण आता जो श्वास घेतोय तो विसरून जातात आणि खरं तर याच क्षणात जीवन दडलेले आहे, तो क्षण आपण जगतच नाही. जर आपण वरील दोन उपाय केले, तर जरूर तुम्हाला या क्षणात जगता येईल आणि आनंद प्राप्त होईल, कारण तुम्ही आहात म्हणून हे जग आहे आणि त्यासाठी प्रत्येक क्षण हा जगून घ्या.
असो मित्रांनो, जगून घ्या. मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांवर लक्ष ठेवा, कारण विचारांचे विष हेच आपल्या आरोग्याचा नाश करत आहे आणि आजार कायमस्वरूपी वास करत आहे. जे मनात पेराल तेच शरीरात उगवते.
वर्तमानात जगा (Live in the Moment).
भूतकाळ गेला आहे, भविष्य अजून आलेले नाही.
पण आपण बहुतेक वेळा त्याच विचारांच्या गोंधळात वर्तमान हरवतो.
खरं आयुष्य या क्षणात आहे—या श्वासात, या हसण्यात, या आनंदात.
जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि भूतकाळाचा भार सोडता, तेव्हाच तुम्हाला वर्तमानात जगणे जमू लागते.
शेवटचा विचार
मित्रांनो,
विचार हे बीज आहे—आणि त्याचे पीक म्हणजे तुमचे आरोग्य.
नकारात्मक विचारांचे बीज पेराल, तर आजाराचे पीक उगवेल.
पण प्रेम, क्षमा, आनंद, कृतज्ञता—या विचारांचे बीज पेराल, तर आरोग्य आणि शांततेचे पीक उमलेल.
“जे मनात पेराल, तेच शरीरात उगवेल.”
लेखक: श्रीकांत शेंद्रे