तिच्यातला तो आणि त्याच्यातील ती…
थोडी या लेखाबद्दलची पार्श्वभूमी सांगायला आवडेल मला .
हे एका पहाटे मला पडलेलं स्वप्न आहे. दोन्ही व्यक्ती तश्याच शांतपणे फिरत आहेत जसं मी लिहलं आहे. पण एकही शब्द दोघे बोलत नाहीयेत. त्यांच्यात काय संभाषण चालू असेल असा विचार करून मी हे लिहिलं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही सगळी ठिकाणं माहिती असल्यामुळे वाचतांना मी पाहिलेलं स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर नक्की दिसेल.
‘‘निघालीस !’’ ... ‘‘अं हो जायलाच हवं ... चार दिवस झाले की ...’’ भांडी बाजारातील बालाजी मंदिराच्या बाजूच्या एका वाड्यातून बाहेर पडलेल्या तिला त्याने विचारले .
‘‘अगं पण गाडी ८ वाजताची आहे ना ! आता तर सहाच वाजले आहेत आणि इथून नाशिकरोडला जायला फारतर एक तास लागेल. मग इतक्या लवकर का निघालीस !’’ ‘‘ह्म्म्म’’ तिच्या या ह्म्म्म मधील स्वर असा होता की जणू याला काहीच कसं कळत नाही. ‘‘येतोस सोडायला ?’’ या तिच्या प्रश्नावर तो गोंधळला. हो हो का नाही ! कसबसं तो पुटपुटला. दोघे समांतर चालायला लागले. भांडी बाजार, सराफ बाजार, बोहरपट्टी करत रविवार कारंजापर्यंत जाऊ आणि मग ती जाईल रिक्षा करून असं त्याला वाटलं. सरकार वाड्यापाशी आल्यावर तिने विचारलं " वेळ आहे ना तुला ?" "मग म्हणजे काय !" तो उत्तरला. " मग फुल बाजारातून जाऊ या !" असं तिने विचारल्याबरोबर त्याने चमकून तिच्याकडे बघितलं. त्याला तासभर अगोदर मी का निघाले हे तिला कदाचित सुचवायचे असावे असा साक्षात्कार त्याला झाला असावा. दोघांची पावले उजवीकडे न वळता डावीकडे वळाली. एकत्रित चालण्याबरोबरच बाजारात असलेल्या गुलाब, मोगरा, सोनचाफा, निशिगंध याचा सुवास ते भरभरून घेत होते. तिचे पाय एका दुकानासमोर थबकले. मोगऱ्याचा गजरा तिचा म्हणजे तिचा वीक पॉईंट होता. " कितीला दिला ?" वीस रुपये .... तिने तो घेतला आणि केसात माळला. पर्स काढून पाचशेची एक नोट काढून त्या दुकानदारासमोर धरली. तो हसायला लागला. काय ताई तुम्ही ... गजरा वीसचा आहे .... सुट्टे द्या की ... त्याचे ते कुत्सित हसणं आणि बोलणं याला खुपलं. ए हसतोस काय ! त्याने चढ्या आवाजात विचारलं. साहेब तुमच्याकडे असतील तर तुम्ही द्या ... चिडताय कश्याला ? त्याने आपलं पाकीट काढलं ... त्यात एकमेव वीसची नोट. ती बघत नाही ना हे बघून त्याने ती नोट पटकन काढून पाकीट खिशात टाकलं. दोघे परत समांतर चालायला लागले. तिच्या उजव्या हातातील हॅन्डबॅग त्याला आता अडचणीची वाटायला लागली होती. मी घेऊ का बॅग असं म्हणत त्याने ती बॅग त्याच्या उजव्या हातात घेतली. प्रकाश सुपारीच्या चौकातून ते परत उजवीकडे वळले. एव्हाना रस्त्यावर रहदारी वाढली होती. धुमाळ पॉईंटकडे जातांना अलीकडे एक हॉटेल लागलं. कॉफी घेऊ या ! तीने विचारले. आता हो म्हणावे तरी पंचाईत कारण खिशात पैसे नाहीत आणि नाही म्हणावे तरी पंचाईत कारण सोन्यासारखी संधी गमवावी लागणार. हो म्हणालास तर एका अटीवर पैसे मी देणार .... आणि त्याचा जीव काय तो अख्खा भांड्यात पडला. उगाच आढेवेढे घेत तो हो म्हणाला. "परत कधी येणार ?" त्याने विचारले. " का ?" तिचा प्रति प्रश्न. बरं वाटतं भेटलीस की. काही गोष्टी बोलता येतात ज्या कोणालाही सांगता येत नाहीत. मुलीसाठी स्थळ सांगून येत आहेत त्याचं टेन्शन, चिरंजीव अजून सेट नाहीत त्याचं टेन्शन, मित्रमंडळी त्यांच्या त्यांच्या व्यवधानात आहेत. बोलू तर कोणाशी बोलू ! कॉफी वर जशी साय आली होती तशी त्याच्या डोळ्यात पाण्याची. तिने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याला अपेक्षित होतं की ती म्हणेल मी फोन करेन आपण बोलत जाऊ. पण ती काही बोलेना. त्याने सावरत घेतलं आणि तो पुढे म्हणाला मला माहिती आहे तुला पण तुझा संसार आहे. तुझे मिस्टर मुलं नोकरी. मी ही अशी काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. "चल निघायचं" तिने त्याची तंद्री भंग केली. परत एकदा दोघे चालत चालत रेडक्रॉसच्या सिग्नलकडे निघाले. त्याचा डावा हात आणि तिचा उजवा हात एकमेकाला स्पर्श करत होते. जणू ते त्यांच्या नात्यातील वीण घट्ट करत होते ज्याला काहीच नाव नव्हतं. घड्याळ्यात संध्याकाळचे सात वाजले होते. सूर्य पश्चिमेकडे विसावत होता. आता मात्र रिक्षा करायला हवी असं म्हणत तिने एका रिक्षेला हात केला. त्याने त्याच्या हातातील बॅग आत ठेवली. ती आत बसली आणि तिने त्याचा हात हातात घेतला. "भेटत राहू" ती म्हणाली. आणि भेट नाही झाली तरी संवाद कायम असला पाहिजे असं कोणीतरी म्हटलं आहे. आणि आता तुला मला आणि मला तुला काही सांगायची इच्छा निर्माण होतीये हेच याचे गेली अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय याचं फलित आहे. तिने हातात घेतलेल्या त्याच्या हाताला ऊब जाणवायला लागली. रिक्षावाल्याने रिक्षा चालू केली ... त्याच्या टेपवर गाणं वाजलं " या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" तिने बाय म्हणत हात सोडला आणि रिक्षा नाशिकरोडच्या दिशेने गेली. रिक्षा गेलेल्या दिशेकडे एकदा आणि स्वतःच्या हाताकडे एकदा तो बघत राहिला. ती ऊब त्याला घालवायची नव्हती म्हणून त्याने दोन्ही हात एकमेकात गुंफले समोरच्याला अनप्रेडीक्टेबल म्हणणारे सुद्धा कधी कधी अनप्रेडीक्टेबलसारखे कसं वागू शकतात हा अनुत्तरित प्रश्न आणि तिच्या सोबत घालवलेला एक तासाचा कस्तुरीगंध मनात ठेऊन तो परत बालाजी मंदिराकडे चालू लागला ..