आयुष्य एक प्रवास आहे जीवन जगण्याचा आणि हा जीवन जगण्याचा प्रवास सुखद आणि आनंददायी करावयाचा असेल, तर त्यावर सर्वात गुणकारी औषध म्हणजे भटकंती... हिंडणे, फिरणे, देश विदेश भ्रमण करणे... पण अनेकांचा एकच प्रश्न असतो, वेळच मिळत नाही. हो... पण तो जीवनाचा प्रवास संपेपर्यंत मिळणार नाही. मी पण असाच विचार करायचो, पण प्रत्येकाला एखादे व्यसन असतेच, मला फिरण्याचे... लोक म्हणतात रिटायर झाल्यावर चारधाम यात्रा करू, बारा ज्योतिर्लिंग करू. पण मग 'एक जिंदगी मिलेगी ना दोबारा' ह्या पिक्चरचा एक डायलॉग आठवतो की चाळीस वर्षांपर्यंत खूप काम करायचे, खूप पैसे कमवायचे आणि मग रिटायरमेंट घेऊन मस्त जगायचे... पण तुम्ही चाळीस वर्ष तरी जगाल याची शाश्वती काय? ह्या अनेक प्रश्नांची उत्तरे करोनासारखी महामारी देऊन गेला... मला हा काळ सर्वात जास्त नुकसानकारक ठरला कारण नेमक्या ह्याच उमेदीच्या काळात मी अनेक जबाबदारीतून मुक्त झालो होतो. येणाऱ्या काळात अनेक फिरण्याच्या योजना करून ठेवल्या, परंतु ते सर्व प्लॅन करोनामुळे फसले आणि मला असलेले भटकंतीचे व्यसन जड वाटू लागले. घरात बसून राहायचे, दिवस रात्र मोबाईलवर पिक्चर नाहीतर सिरीअल पाहायचे. अशा प्रकारे कधीही झोपा, कधीही खा-प्या त्यामुळे आपली दैनंदिन दिवसाची सवयच बदलून गेली, करोना महामारीतून थोडा बाहेर पडलो पण दैनंदिन सवयच बदलत नव्हती. मग ठरवले याला पर्याय एकच कुठेतरी फिरून येऊ, अनेक मित्रांना विचारणा केली पण ते सर्व इतके बिझी की करोना काळात त्यांची राहिलेली कामे त्यांना आता कधी पूर्ण होतील याची चिंता. मग ठरवले की जायचे फिरायला... एकटेच.
मग कधी निघायचे... एकटाच आहे तर मग काय उद्याच, पण कुठे, धार्मिक का थंड हवेच्या ठिकाणी, मग विचार केला आपल्याला दैनंदिन बदलाची सायकल बदलायची आहे तर असे ठिकाण जिथे सकाळी लवकर उठणे, वेळेवर रुचकर पौष्टिक जेवण, वेळेत झोप आणि निसर्गाचा आनंद, सोबत धार्मिक सुख. हो आणि ते ठिकाण सापडले ते म्हणजे योग विद्येचे माहेरघर (Yog Capital of World) ऋषिकेश. लगेच मुंबई-देहरादून (व्हाया दिल्ली) चे विमानाचे तिकीट बुक केले. एका मित्राला फोन केला जो उत्तराखंडचा राहणारा होता पण आता नोकरी निमित्त नाशिकमध्ये राहत होता. त्याने त्याच्या काही स्थानिक मित्रांच्या ओळखीतील २-३ योग आश्रमाची माहिती दिली मग काय दुसऱ्या दिवशी पाठीवरच्या एका बॅगेमध्ये दोन जोडी कपडे घेतले आणि नो प्लॅन अशा प्रवासाला सुरुवात केली. एकाने मुंबई नाक्याला सोडले तिथे मुंबई विमानतळ पिक अप ड्रॉप वाले उभेच असतात. ५०० रुपये प्रति सीट प्रमाणे बसलो आणि तेव्हाच मनामध्ये ठरवून टाकले की आता जे मिळेल त्या साधनांनी प्रवास, जिथे मिळेल तिथे राहायचे, ते म्हणतात ना एकटा जीव सदाशिव बस तसेच. मग प्रवास दरम्यान मिळालेल्या योग विद्या आश्रमांची माहिती मोबाईलवर सर्च करायला लागलो त्यातील एका आनंद प्रकाश योग आश्रम आणि रिट्रीट सेंटरचा नंबर मिळाला कॉल करून माहिती घेतली सध्या कोणतीही रेगुलर बॅच चालू नसल्यामुळे साधारण तीन दिवसाचे वास्तव्याचे पॅकेज मिळाले ऑनलाईन पैसे भरून बुक पण करून टाकले. रात्रीच विमान पकडून उशिरा दिल्लीला पोहोचलो. पुढील डेहराडूनला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत होतो तेव्हा एक पुण्याचा व्यक्ती विमानतळावर भेटला विनीत नावाचा तो पण एकटा ऋषिकेशला ट्रेकिंगसाठी चालला होता. मग विमानात सोबत बसलो अनेक गप्पा झालया तीन दिवसासाठीच आला होता कारण त्याला ट्रेकिंगचे वेड होते आणि सुट्टी तीन दिवसाचीच मिळाली होती. तो पण ऋषिकेशला पहिल्यांदाच येत होता त्याच आजचा ऋषिकेशला थांबण्याचा प्लॅन होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन दिवसाचे ट्रेकिंग आणि परत लगेच पुणे, त्याला म्हटले ऋषिकेशचे रिव्हर राफ्टिंग हे खास आकर्षण आहे ते तरी करायला पाहिजे.
डेहराडून उतरलो तिथून ऋषिकेशला जायला टॅक्सीने २००० रु सांगितले मग काय विनीतचा नंबर घेतलाच होता त्याला कॉल करून टॅक्सी शेअर करू म्हटले त्यात आणखी मुंबईचे दोन तरुण भेटले मग काय चौघे ५००-५०० रुपयात ऋषिकेशला सकाळी १० वाजता पोहोचलो. मी आनंद प्रकाश योग आश्रमात पोहोचलो. त्यांनी सांगितले की तुम्हाला दुपारी १ नंतर रूम मिळेल पण त्यांनी बघितले की मी पूर्ण रात्रीचा प्रवास करून आलोय त्यांनी मला रूम दिला. अंघोळ करून फ्रेश झालो तितक्यात विनीतचा फोन आला रूम मिळाला का. कारण त्याने ऑनलाईन बुक केलेल्या हॉटेलने रूम २ वाजता देऊ असे सांगितले. पण तो म्हणाला की मी फ्रेश झालोय ती रिव्हर राफ्टिंग आपल्याला आज करता येईल का पण प्रश्न हा होता की त्याला पोहता येत नाही मग मी त्याला सांगितले की मला पण कुठे येते. आम्ही एकमेकांना भेटून रिव्हर राफ्टिंग बद्दल चौकशी केली आणि लगेच निघालो १६ किमी ची रिव्हर राफ्टिंग करायला. त्यांच्या गाडीने शिवपुरी येथील ठिकाणी घेऊन गेले नदीचे खळखळणारे पाणी पाहून थोडी भीती विनीतच्या मनात आली पण मी त्याला धीर दिला तसे मी काय घाबरलो नव्हतो असे काही नाही पण ह्यापेक्षा मोठ्या रिव्हर राफ्टिंगचा अनुभव मी लेह-लडाख घेतलेला होता त्यामुळे मानसिक तयारी होती. तीन तासाच्या रिव्हर राफ्टिंग मध्ये दोन वेळा बोटीतून पडता पडता वाचलो परंतु तशी पोहता येत नसेल तरी चिंता नसते कारण लाइफ जॅकेट, हेल्मेट अशा सर्व आवश्यक गोष्टी परिधान केलेल्या असतात फक्त आपला जो नाविक किंवा रक्षक आपल्याला देत असलेल्या सूचनांचे पालन करत राहायचे म्हणजे झाले. आणि मग काय विनीतची मैत्री जरा घटच झाली तो म्हणला माझ्याकडे आजचा दिवस आहे आपण आज सायंकाळी गंगा आरती आणि ऋषिकेश लोकल फिरायला जाऊ. एक ऍक्टिव्ह गाडी ४ तासासाठी रेंटवर घेतली सायंकाळी ऋषिकेश पालथे घातले सायंकाळी मस्त गंगा आरतीचा आनंद घेतला, तेथील प्रसिद्ध हॉटेल चोटीवाला मध्ये जेवण केले हॉटेल बाहेर एक चोटीवाला बाबा बसलेला असतो त्या पुढे एक घंटा टांगलेली असते जेवण आवडले का मग बाहेर येऊन वाजवायची. अशा प्रकारे पहिला दिवस संपला.
आनंद योग आश्रमातून सांगितले होते की ९ वाजच्या आत यायचे आहे, त्यामुळे लवकर पोहोचलो कारण दुसऱ्या दिवसापासून आश्रमाची दिनचर्या सुरू झाली. सकाळी ४.३० ला उठायचे व योग आश्रमाच्या ४ मजल्यावर असलेल्या गच्चीवर ४५ मिनिटे ध्यान, नंतर ४५ मिनिटे योग्य अभ्यास, शांत वातावरण, शुद्ध हवा, समोर उंच हिरवेगार डोंगर, अशा ह्या नयनरम्य वातावरणात मन प्रफुल्लित झाले. सोबत आणखी १५ च्या आसपास साधक असतात, त्यात अनेक परदेशी होते. त्यानंतर मग मस्त आश्रमाच्या आतच घरगुती चहा नाश्ता, रोज मंत्रोच्चारात होम-हवन असतो. तिथे एक छोटी लायब्ररी आहे. १२ ते १ च्या दरम्यान पौष्टिक जेवण, ते पण पंक्तीत बसून आणि हो, आपले ताट जेवण झाल्यावर आपणच धुवून ठेवायचे. त्यानंतर आपण आराम करू शकता किंवा फिरून येऊ शकता, कारण सायंकाळी ५.३० ला आश्रमांतील तळघरात पुन्हा ध्यान व योग्य अभ्यास घेतात, त्यानंतर जेवण आणि मग ८.३० ला झोपायचे, कारण सकाळी परत ४.३० ला उठायचे असते. अशी दिनचर्या तीन दिवस केली, दोन दिवस बुकिंग वाढवून घेतले. कुठे फिरायला जात येईल ह्याची माहिती घेतली, मग हरिद्वारला जाण्याचा विचार केला कारण ते फक्त २५ किमी दूर आहे, परंतु आश्रमातील व्यक्तीने आज जाऊ नका सांगितले कारण त्या दिवशी पौर्णिमा होती आणि कोरोनानंतर लोक प्रचंड प्रमाणात बाहेर पडले आहेत, त्यामुळे हरिद्वारला खूप गर्दी झाली, पूर्ण ट्राफिक जाम असल्यामुळे २५ किलोमीटर जायला बस किंवा टॅक्सीला २-२ तास लागत आहेत. जरी आज गेला तरी परत यायला खूप उशीर होईल. मग जाण्याचा विचार बदलून ऋषिकेशमध्येच फिरून यायला निघालो.
पायी पायी फिरत असताना ज्या ठिकाणाहून पहिल्या दिवशी ४ तासांसाठी ऍक्टिव्ह भाड्याने घेतली होती त्या दुकानाजवळ आलो, तिथे एक रॉयल एनफिल्ड - हिमालयन बाईक दिसली. मग काय, मन शांत बसणार? घेतली गाडी आणि निघालो हरिद्वारच्या प्रचंड ट्राफिकमधून, स्पोर्ट्स बाईक पाहिजे तसे रस्ते आणि वळण घेऊन १ तासात हरिद्वार गाठले, पण तेथील कुंभमेळ्यासारखी गर्दी पाहून हबकलो की गाडी कुठे पार्क करायची, कारण भाड्याची गाडी चोरी गेली तर खूप महाग पडेल तीर्थयात्रा. पण गंगा नदीचे दर्शन तर करायचे, मग एक मिठाई चहाच्या ठेल्याजवळ गाडी उभी केली, चहा घेतला, १० रु. बिल झाले, मुद्दामून १०० रुपयांची नोट दिली, सुट्या पैशावरून वाद झाला, मग असू दे म्हणत आलो, १५ मिनिटांत इतकी गाडी आणि हेल्मेट सांभाळ. मग काय, मस्त सेल्फी स्टिक काढून अख्खा गंगा घाट फिरून मस्त नदीत हात पाय धुऊन आपल्या बाईककडे आलो. ठेल्या वाल्याचे आभार मानले आणि त्याने ऋषिकेशला जायचा एक पाटाचा रस्ता सांगितला. अशा ह्या ट्राफिक नसलेल्या रस्त्यावर १०० हुन अधिकच्या वेगाने अर्ध्या तासात ऋषिकेश गाठले. नाशिकला परतीचे कोणतंच बुकिंग केलेले नसल्यामुळे पुढचा प्लॅन करण्यासाठी टॅक्सी स्टॅन्ड गाठले आणि चौकशी केली ती म्हणजे पुढे जाण्याचा, जय भोले धाम केदारनाथला जाण्यासाठी काय व्यवस्था आहे. सकाळी गाडी निघते, परंतु त्यासाठी दर्शनाला जाण्यासाठी सरकारी ऑनलाईन बुकिंग असली पाहिजे, तरच त्या तारखेचे टॅक्सी किंवा बसचे तिकीट मिळते. मोबाईलवरून ऑनलाईन बुक केले, केदारनाथ यात्रेची सुरवात होती, बुकिंग ५ दिवसानंतरचे मिळाले. टॅक्सी सेवा देणाऱ्याने सुचवले एकटेच आहे तर मी तिकीट देतो, जिथे चेकिंग होते तिथे विनंती करा नाहीतर तिथून परत यावे लागेल. तिकीट घेतले, योग आश्रमात आलो, एकाच सॅक आणि दोनच जोडी कपडे आवरून ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नव्या प्रवासाला सुरवात केली.
रस्त्यात चेकिंग पॉईंटला मिलिटरीचे जवान चेकिंगला होते, नशीब चांगले की ते मराठी होते, मग काय जय महाराष्ट्र करून पुढे निघालो, सायंकाळी गौरीकुंडला पोहोचलो. हे शेवटचे रोडने जाणारे ठिकाण, इथूनच केदारनाथला ट्रेकिंगने सुरवात होते. प्रचंड उत्साह आणि कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेल्या यात्रेला तुफान गर्दी झाली, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यात्रा त्या दिवसासाठी स्थगित केली. तिथेच एक डॉर्मेटरी मिळाली. गर्दीचा अंदाज पाहून आणि सतत बदलणारे वातावरण पाहून आपण एकटे ट्रॅकिंग करावे का ह्याबद्दल मनात शंका निर्माण होऊ लागली. इथून हेलिकॉप्टरची पण सेवा असते हे समजले, मग काय लगेच मित्र संदीप शिंपीला कॉल केला, त्याचा पहिला प्रश्न तू एकटा कसा काय तिकडे गेला, त्याने सांगितले की शक्य नाही कारण ३ महिने पहिलेच बुकिंग फुल्ल होते. मग काय आता झोपू आणि पहाटे ट्रेकिंगला सुरवात करू. पण काय मित्रालाच काळजी म्हणता ना, रात्री १० ला संदीपचा कॉल आला. काम झाले पण सकाळी ६ वाजता ह्या कंपनीच्या हेलिपॅडला पोहोचून एक नंबर दिला आहे त्याला कॉल कर, पैशाचे काही बोलू नको मी त्याला पैसे देऊन टाकेल. मॅपवर बघितले सदर हेलिपॅड मी असलेल्या ठिकाणाहून ५ किलोमीटर लांब होते आणि तिथे जायला कोणतीही बस किंवा टॅक्सी सेवा नसते, मग काय सकाळी ५ लाच उठून पायी पायी हेलिपॅडला पोहोचलो, सदर व्यक्तीला कॉल करून वाट पाहत बसलो, प्रचंड गर्दी, १५ ते २० मिनिटात हेलिकॉप्टर यायचे आणि १ मिनिटात प्रवाशांची चढ-उतार करून पुन्हा आकाशात उडायचे. दोन तास बसून होतो तितक्यात माझ्या नावाचा पुकारा झाला आणि मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो, ते पण पहिल्यांदाच, माझा पहिला हेलिकॉप्टरचा प्रवास १० मिनिटात केदारनाथला पोहोचलो, आकाशांतून केदारधाम मंदिराचे मनमोहक दर्शन झाले. दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो. एक मुलगा मुलगी माझ्या पुढे रांगेत उभे होते, त्याचे मराठीत बोलणे ऐकून शेवटी विचारलेच कुठेले? नाशिकचेच निघाले, मग काय ८ दिवसानंतर आपल्या घरचा माणूस भेटल्यासारखे वाटले. त्यात त्यांचे रोख पैसे संपले होते आणि ऑनलाईन द्यायला मोबाइलला सिग्नल नाही, मग त्यांना मी १००० रुपये दिले, ते म्हणले रेंजमध्ये आलो की पाठवतो, त्यांना म्हटले चिंता नको नाशिकला आल्यावर द्या. सुंदर भव्य दिव्य केदारनाथचे दर्शन घेऊन थोडी फोटोग्राफी केली आणि तेथील उंच हिमालय पर्वत बघून मन प्रफुल्लित झाले, तेव्हा समजले की ह्या जागेला स्वर्गाचे द्वार का म्हणतात, वातावरणात बदल व्हायला लागला, हलकासा पाऊस पण सुरू झाला, थंडगार वाऱ्याची झुळूक पण जाणवू लागली. लगेच हेलिपॅडकडे आलो, तेथे प्रचंड गर्दी झाली होती, मग समजले की ६-७ कंपन्या इथे हेलिकॉप्टर सेवा देतात आणि मंदिरा जवळ एकच हेलिपॅड वापरतात. ज्या कंपनीची सेवा मी घेतली होती त्या काउंटरला आलो, तिथे खूप गर्दी झाली होती, एकच माणूस काउंटरला होता, हेलिकॉप्टर सेवा पावसामुळे थांबवली होती. त्या एकट्याची धावपळ पाहून त्याला मी मदत केली जेणेकरून आपला नंबर लवकर लागेल.
पण मला हेलिकॉप्टर कंपनीचा माणूस समजून एका प्रवाशाने चांगलेच सुनावले, पण त्याचा फायदाच झाला. जेव्हा त्यांना समजले की मी पण प्रवासी आहे, तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली आणि कॉफी पाजली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले, "आम्ही दोघे मित्रच आलेलो आहोत, आमची गाडी खाली हेली पॅडजवळच उभी आहे, तुला पुढे आम्ही सोडतो." आणि दोन नवे मित्र मिळाले. मग काय, त्यांनी कर्णप्रयाग येथे सोडले, ते पण स्थानिक जेवण घालून. मग घराची ओढ लागली. ऋषिकेश रस्त्याने जाणाऱ्या जीपमध्ये बसलो आणि तितक्यात लहान भावाचा फोन आला, "कुठे आहेस?" चौकशी करायला. सांगितले निघालो आता घराकडे, बद्रीनाथ जायचे कॅन्सल केले. त्याने विचारले, "किती किलोमीटर दूर आहे तिथून?" साधारण १००-१२५ असेल. तो म्हणाला, "जवळच आहे, परत जाणे होईल का?" मग काय, उतरलो गाडीतून आणि बसलो बद्रीनाथच्या रूटने जाणाऱ्या गाडीत, रात्री रस्त्यातच एका लहानशा गावात सोडले. तिथे एक लॉज मिळाले, ते नदीकिनारी होते. रात्रभर पाण्याचा इतका खळखळाट की पाणी वाढले तर जायचो वाहून. सकाळी उठून एक बस पकडली, डोंगर-दऱ्यांमधून रस्ता पार करत, मी खिडकीजवळच बसलो होतो. बस इतकी कडेने चालायची की खोल दऱ्या पाहून वाटत होते गाडी हवेतच चालत आहे. बद्रीनाथ धामला पोहोचलो. प्रचंड थंडी होती, जवळच एक हॉटेल घेतले. अंघोळीसाठी गरम पाण्याची विचारणा केली, तर सांगितले की गिझर आहे, पण पाणी इतके थंड आहे की कोमट व्हायलासुद्धा २ तास लागतात. मग हॉटेल वाल्याने सांगितले की मंदिरा जवळच गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. कुंड तील पाणी इतके गरम होते की त्यात जवळच वाहणाऱ्या अलंकानदा गंगेतून गार पाणी घ्यावे लागले. मंदिराबाहेर थांबून फोटो काढले आणि मनसोक्त बद्रीनाथचे दर्शन घेतले. मग तेथील बस स्टॅन्डला येऊन ऋषिकेशला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली, तर रात्रीच्या गाड्या नसतात, सकाळी गाडी मिळेल पण त्याचे कोणतेही वेळापत्रक नाही. दुसरा मार्ग म्हणजे टॅक्सी म्हणजे आपली जीपगाडी, पण ऋषिकेशला जायला ४ वेळा ठिकाणी गाडी बदलावी लागेल. हाडे गोठवणारी थंडी, हॉटेलला पोहोचलो आणि एका मित्राला कॉल केला परतीच्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी, कारण तिथे मोबाईलला इंटरनेटची अडचण होती. मग त्याने दिल्ली-नाशिक विमान व्हाया अहमदाबाद ह्या विमानाचे बुकिंग केले, ते दुसऱ्या दिवशी रात्री दिल्लीहून होते. मग काय सकाळी ६ वाजताच स्टॅन्ड गाठले, परंतु बस काही नव्हती, शेवटी एका जीपमध्ये बसणार तितक्यात एक बस आली, पळत जाऊन बस गाठली, डायरेक्ट ऋषिकेश गाडी असल्यामुळे बस लगेच फुल झाली. बसमध्ये शेवटून ३ नंबरचे सीट मिळाले म्हणजे मागील टायरवरचे. २८० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १० तासांहून जास्त वेळ लागला, संपूर्ण रस्ता घाट वळणाचा, सायंकाळी ऋषिकेशला पोहोचलो. दिल्ली व्होल्वो बस उभी होती, लगेच बसमध्ये बसलो आणि ५ तासात दिल्ली गाठली, लगेच टॅक्सी पकडून एअरपोर्ट गाठले. जेमतेम फ्लाइटच्या १ तास आधी पोहोचलो आणि विमानात बसलो व्हाया अहमदाबाद, सकाळी ८ ला नाशिक, साधारण २४ तासात नॉनस्टॉप बद्रीनाथ ते नाशिक प्रवास करून सुखरूप घरी पोहोचलो. कसे १० दिवस गेले ते कळाले पण नाही, ह्या प्रवासात एक गोष्ट शिकायला मिळाली की मनाची तयारी आणि बिनधास्त पणा असला की काही करू शकतो. ह्या १० दिवसात हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ सारख्या धार्मिक स्थळांना भेट तर दिलीच, पण अनेक नवीन मित्र मिळाले. आणि हो सर्व प्रकारचा प्रवासी वाहनांचा वापर केला. अशाप्रकारे १० वे ज्योतिर्लिंग पूर्ण झाले, पण कोणीतरी सांगितले की केदारनाथ नंतर पशुपतिनाथ नेपाळला गेल्यावर तुमचे जोतिर्लिंग पूर्ण होते, मग काय पुढचे डेस्टिनेशन मिळाले ................नेपाळ........