हस्तलिखितांची परंपरा ही खूप मोठी समृद्ध आणि शाश्वत अशी परंपरा आहे. आजही अनेक जुन्या घरांमध्ये वाड्यांमध्ये आणि जी जुनी शहर आहेत, जुने विशेष असलेले तीर्थक्षेत्र आहेत, यांच्याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हस्तलिखित पहायला मिळतात. अनेक लोकांकडे घराची पुनर्बांधणी आहे किंवा जुने घर पडले त्याच्या एखाद्या कपाटामध्ये कुठेतरी हजारोंनी हस्तलिखित सापडले, अशा अनेक कथा ऐकिवात आहेत. याच प्रकारच्या अनेक गोष्टी आज जुनेजाणते लोक सांगतात आपल्याला माहितीच असेल डॉक्टर भांडारकरांनी तसेच श्री राजवाडेंनी अनेक प्रकारचे ग्रंथ हे वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या राज्यातून एकत्र केले आणि ते आजही आपल्याला भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट तसेच धुळ्याच्या राजवाडे संशोधन या ठिकाणी पाहायला मिळतात. यांच्यासारख्या अनेक दृढनिश्चयी संशोधक वृत्तीच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर हस्तलिखितांचा संग्रह हा करून ठेवलेला आहे, ह्यावर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा अभ्यास होण्याची गरज आहे.
हस्तलिखित आणि त्याच्या परंपरेबद्दल सांगायचे झाल्यास, सर्वात पहिल्यांदा वेद आणि धर्मशास्त्र या विषयाची अनेक हस्तलिखिते लिहिली गेली कारण वेद हे कायम श्रुती स्वरूप म्हणजे फक्त ऐकूनच पाठ केलेले असे होते, कालांतराने संशोधक वृत्तीच्या व्यक्तींनी श्रुती मधील वेदांची लिखित स्वरूपे उपलब्ध केली, तसेच इतरही अनेक विषयांमध्ये म्हणजे ज्यात शिक्षा ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ आहेत, निर्णय ग्रंथ या सर्वांची हस्तलिखिते उपलब्ध करण्याची तयारी सुरू झाली. त्याचबरोबरीने नंतरच्या काळात लिखाण साहित्य जसे पुरेपूर उपलब्ध होऊ लागले त्यानंतर वैद्य परंपरा आणि इतर वास्तु निर्माण या विषयावरील ग्रंथांच्या हस्तलिखितांची निर्मिती झाली. जी हस्तलिखित उपलब्ध होत गेली त्यावर अनेक विद्वानांनी त्यांच्या टीका लिहिल्या, ते टीका स्वरूप ग्रंथ तयार झाले. आपण बघतो रामायण महाभारत तसेच भागवत ही महाकाव्य मूळ स्वरूपात उपलब्ध झाली त्यानंतर त्या विषयातील जाणकारांनी अनेकविध टीका पर ग्रंथ निर्माण केले आजही आपल्याला महाभारताचे रामायणाचे अनेक संस्करण पाहायला मिळतात भागवतावर देखील अनेक टीका आज उपलब्ध आहेत.
या हस्तलिखिताच्या लेखन कलेमुळे आज आपल्याला सर्वात जुने वेद ग्रंथ जसे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आदिग्रंथ श्रुती तून लेखनाच्या माध्यमाने उपलब्ध झाले, ज्या ग्रंथांना अपौरुषेयत्व प्राप्त होते ते लेखन स्वरूपामध्ये अनेकांपर्यंत पोहोचले. जसे धर्मग्रंथ उपलब्ध झाले तशाच स्वरूपात आणि मोठ्या वैदिक परंपरा यादेखील आपल्या कर्मकांडाच्या अथवा पूजा पद्धतीच्या अनेक ग्रंथांच्या निर्मितीमागे लागल्या. मुळात हस्तलिखित म्हणजे एक किंवा दोन कृती पण ज्या वेळेला शिष्य परंपरांना हे सर्व ग्रंथ आवश्यक होते त्यावेळेला त्याच्या अनेक प्रती निर्माण केल्या जाऊ लागल्या म्हणजेच मूळ प्रतिच्या अनेक कॉपी केल्या जाऊ लागल्या. मग त्यात लेखकांच्या झालेल्या चुका किंवा लेखकांनी केलेले पाठभेद तसेच लिपीकाराच्या चुका, लिपिकाराचे लिखाणातील पाठभेद हे सर्व पुढे वाढत गेले आणि त्यानंतर जो मूळ जाणकार असेल त्याला या चुका समजू लागल्या आणि नंतर मूळ हस्तलिखित त्याच्या प्रती सुद्धा शुद्ध करणे साठी काम सुरू झाले. "वैदिक" परंपरे सारखीच "वैद्य" परंपरा हीदेखील लिपिबद्ध होऊ लागली, आयुर्वेदाच्या उपचाराच्या अनेक पद्धती आहेत, अनेक औषधी गुण आहेत हेसुद्धा साधारणतः मागील पाचशे सातशे वर्षात मोठ्या प्रमाणावर लिपिबद्ध झाले.
आज जे हस्तलिखितांचे अंकीकरण झाले आहे, त्यात मोठ्या प्रमाणावर वैद्यक ग्रंथ उपलब्ध आहेत त्यात अगदी सुश्रुत संहिता, माधवनिदान, वैद्यजीवन आणि छोट्या-मोठ्या उपचार पद्धती अगदी घरातील उपचार मोठे रोग व त्यावरील उपचार आणि बरोबरीने अनेक औषधी संग्रह हेदेखील आज लिपिबद्ध झाल्यामुळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे आपली ही सार्थ परंपरा या हस्तलिखितांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली आहे. काही तथाकथित लोकांचे म्हणणे असते की आपल्याकडे लिखित पुरावे, लिखित ग्रंथ, कागदपत्र यांची संख्या खूप कमी आहे, पण हे साफ चूक आहे आपल्याकडे लेखनाची परंपरा ही खूप जुनी आहे आणि त्यात आपल्याकडे झालेल्या परकीय आक्रमणांमुळे तसेच अनेकांनी त्या हस्तलिखितांना नष्ट केल्यामुळे आपल्याकडील ठेवा नष्ट झाला आहे.
पण त्यातही काही घराणी मात्र या हस्तलिखितांकडे विशेष लक्ष पुरवत आहेत उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास मेन रोडवर श्री जयंत गायधनी, कानडे मारुती लेन मध्ये खेडकर शास्त्रींचा श्री महाशब्दे यांनी सांभाळलेला संग्रह, पंचवटी मध्ये तात्या शास्त्री गर्गे यांचा संस्कृत व्याकरणाच्या संबंधित असलेला गर्गे घराण्याने सांभाळलेला संग्रह,श्री गिरीश टकले यांचा संग्रह, वैदिक ज्ञान विज्ञान पाठशाळेतील संग्रह, तसेच सार्वजनिक वाचनालय नाशिक या ठिकाणी असलेला उत्तुंग असा 15000 पोथ्यांचा संग्रह हे नाशिकमधील नवलच आहे. ह्या लोकांमुळे, संस्थांमुळे अमूल्य संग्रह आपणास "ह्याची देही ह्याची डोळा" पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
हा सर्व ठेवा जतन होण्यासाठी फार मोठे कार्य होण्याची गरज आहे, सर्वच जाणकारांनी अथवा त्या जाणकारांना मदत करणाऱ्यांनी या हस्तलिखितांकडे "ज्ञानाची तिजोरी" "knowledge Bank" म्हणूनच पाहण्याची गरज आहे आणि त्याचे जतन संवर्धन जर झाले, तर पुन्हा भारत सर्व जगात समृद्ध राष्ट्र होईल.