स्वभाषा, स्वराज्य व स्वधर्म ज्यांना सांभाळता आला नाही त्यांची वाताहत झाली हे इतिहासाने अनेक वेळा सिद्ध केले आहे. एकदा या तीनही किंवा यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर आक्रमण झाले तर त्यांचे हिरावलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी अनेक वर्षे झगडावे लागते. या आक्रमणामुळे आपण हजारो वर्षांत मिळविलेले ज्ञान व वर्धिष्णू केलेली संस्कृती आपल्यापासून हिरावून घेतली जाते. किंबहुना ती मुद्दाम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच जर पूर्णतः संपन्न जीवन जगावयाचे असेल तर स्वराज्य व स्वधर्माबरोबर स्वभाषेचे म्हणजेच मातृभाषेचेही तितक्याच सतर्कतेने रक्षण केले पाहिजे. हो! मी तुमची मातृभाषा मराठीच तुम्हाला हे सांगत आहे.
जागे व्हा ! मला विसरण्याचा किंवा विसरल्याचा अभिनय करू नका !
तुम्ही कितीही माझ्याकडे पाठ फिरविली तरीही तुमच्या मनाच्या साम्राज्यावर अविरत राज्य माझे आहे. तुमच्या मनाच्या गाभार्यात प्रकट होणारे प्रत्येक विचार माझ्याशिवाय पूर्णरूप धारण करू शकत नाही. तुमच्यातील अनेक छुपे पैलू माझ्या माध्यमाशिवाय उलगडू शकत नाही.
हा माझा अहंकार नाही, तर माझे मातृहृदयीचे हक्काचे सांगणे आहे. आईशिवाय जास्त आपल्या मुलांना जगात कोण समजू शकते. आज तुमची मनातल्या मनात होणारी घुसमट, द्विधा अवस्था फक्त मलाच समजू शकते, त्यावरील उपाय देखील माझ्यातच लपलेला आहे. आज तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त झाल्या आहेत. जगातील सर्व ठिकाणी तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने सरशी प्राप्त केली आहे. त्याबद्दल तुम्हाला मान सन्मान प्राप्त झाला आहे, आणि तो का होऊ नये? त्यामागे तुमची अफाट मेहनत आहे. परंतु इंग्रजांनी तुमच्या मनात एक कायमची भावना निर्माण करून ठेवली आहे की हे यश फक्त तुम्हाला तुमच्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींचा त्याग केल्यामुळेच मिळाले आहे. अन्यथा तुम्ही इथेच गरिबीत व अंधश्रद्धेत खितपत पडला असता.
मात्र, हे मुळीच सत्य नाही. तुम्ही हा भ्रम मनातून काढून टाका. इंग्रज येण्याआधी आपण संपन्न नव्हतो का? नक्कीच होतो. परंतु आपल्यात असणार्या दुर्लक्ष प्रवृत्तीमुळे आपण कायम आपली संपन्नता दुसर्याच्या आधीन करून मोकळे झालो आहोत. संपन्न जीवन जगणे म्हणजे केवळ भौतिक सुख उपलब्ध करून उपभोगणे नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा विकास करून आपल्या जीवनात निरंतर चैतन्य निर्माण करणे होय. ह्यासाठी आपल्याला आपल्या भूतकाळाशी असलेले नाते जपून ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेल्या प्रचंड आणि समृद्ध अशा साहित्याच्या ठेव्याचं जतन करून त्यात भर घालणं आवश्यक आहे.
आज तुमची व तुमच्या पुढच्या पिढीची ह्या ठेव्याशी असलेली बांधिलकी विरत चालली आहे. जे परकीयांनी निर्माण केले आहे तेच सत्य व आपल्याला काही नवीन करावयाचे असेल तर ते त्यांच्याच धर्तीवर निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही, असा गैरसमज तुमच्या मनात घर करून बसला आहे.
तोडा ! ही बंधनं तोडा ! या अंधश्रद्धेतून बाहेर या. तुम्ही अमृताचे पुत्र आहात. अमृत सेवन हा तुमचा अधिकार आहे. ही तहान ताकावर भागवू नका.
या ! पुनःश्च माझ्याकडे परत या ! मी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. मी तुम्हाला खात्री देते की ज्या वैभवात मी तुमच्या पूर्वजांना नांदविले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीत मी तुम्हाला समृद्ध करेन.
माझ्याशी फारकत करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका, कारण तुमची नाळ माझ्याशी घट्ट बांधली गेली आहे. तुमचे इतरांशी नव्याने जाेडले जाणारे बंध मला कधीच खटकणार नाहीत, परंतु माझ्याशी असलेला बंध तुम्हाला कधी भरकटू देणार नाही.
पवनेश कोठावदे
११/०१/२०१५