स्थळ : पेठे हायस्कूल, रविवार कारंजा, नाशिक. 1989 च्या आमच्या इ. 10 वीच्या मित्रांच्या बॅचची पुनर्भेट…
पंचवीस वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या त्या जुन्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं…
आणि मन क्षणात विद्यार्थी झालं!
पेठे विद्यालयाच्या त्या वर्गात शिरताच
डोळ्यांसमोर उभा राहिला तोच —
भव्य काळा फळा…
डस्टरने पुसताना उडणारी खडूची पांढरी धूळ,
आणि त्या धुळीतून झळकणारा ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश!
त्या फळ्यावर लिहिलेलं प्रत्येक अक्षर
फक्त शब्द नव्हते…
ते आमचं भवितव्य घडवणारं बीज होते.
आणि त्या फळ्यासमोर उभे असायचे
आमचे देवतुल्य शिक्षक —
ज्यांच्या एका नजरेत शिस्त,
आणि एका शब्दात आयुष्य बदलण्याची ताकद होती.
पण…
आज जेव्हा मी माझ्या मुलांच्या
चकाचक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो,
तेव्हा त्या फळ्याच्या जागी
मोठे डिजिटल स्क्रीन दिसतात.
खडू नाही…
धूळ नाही…
पण चमक मात्र प्रचंड!
आणि तेव्हा मनात एक प्रश्न नकळत उभा राहतो —
हा बदल म्हणजे ज्ञानाचा विकास आहे…
की विद्यार्थ्यांच्या मनातला गोंधळ?
आमची शाळा… आणि ते संस्कारांचे शिलेदार
आमच्या काळात फळ्यावर जे लिहिलं जायचं,
ते फक्त वहित उतरायचं नाही…
ते थेट मनावर कोरलं जायचं!
शिक्षकांचे धडे म्हणजे केवळ पानं पूर्ण करणं नव्हतं;
ते आमच्या आयुष्याच्या पुस्तकात कायमस्वरूपी उमटणारे अध्याय होते.
आजही डोळे मिटले की
गोडबोले मॅडम, ओसवाल सर, गोटखिंडीकर सर, जोशी सर
यांनी खडूने फळ्यावर मांडलेली गणितं आणि प्रमेय
तशीच जिवंत उभी राहतात.
त्या रेषा फक्त आकृत्या नव्हत्या…
त्या आमच्या प्रगतीच्या वाटा होत्या!
का.वि. जोशी सर, भालचंद्र मनमाडकर सर, बुरकुले सर,
सराफ सर, देव सर —
यांनी शब्द शिकवले नाहीत,
तर शब्दांना अर्थ दिला.
म्हणूनच आमची मराठी, हिंदी आणि इंग्रजी
हे फक्त भाषा विषय राहिले नाहीत…
ती आमच्या विचारांची भाषा बनली.
त्या काळात शिस्त आणि प्रेम यांचा एक विलक्षण संगम होता.
रत्नपारखी सर, रत्नपारखी मॅडम, शिवदे सर
आणि इतर सर्व शिक्षकांची वर्गातली उपस्थिती म्हणजे
जणू एक न बोलता जाणवणारी शिस्त होती.
आजच्या “मल्टीटास्किंग”च्या युगात
'एकाग्रता' शोधावी लागते!
डी.एम. कुलकर्णी सर आणि केळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही फक्त धडे शिकलो नाही…
तर जगण्याची शहाणपणाची भाषा शिकलो.
ऐई देशा… ऐई माटी…
आजही डोळे मिटले की
ते सामूहिक स्वर कानात घुमतात —
“ऐई देशा, ऐई माटी, ममतामयी माटी…”
केळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली गायलेलं ते गाणं
फक्त ओठांवर नव्हतं…
ते आमच्या श्वासात आणि रक्तात भिनलेलं होतं!
त्या सुरांतून आम्ही फक्त गाणं शिकलो नाही,
तर देशभक्तीचा अर्थ समजलो…
मातीशी नातं कसं जोडायचं, हे शिकलो.
त्या एका प्रार्थनेत
पुस्तकांपेक्षा मोठं शिक्षण होतं.
आजच्या या “व्हर्च्युअल” जगात
हजारो व्हिडिओ, लाखो स्क्रीन उपलब्ध आहेत…
पण त्या गाण्यातून मिळालेली
मातीची ओढ, ती ऊब, ती ममता —
कोणत्याही स्क्रीनवर डाउनलोड करता येत नाही!
कारण ती भावना शिकवली जात नाही…
ती संस्कारातूनच रुजवली जाते.
आणि ते संस्कार
आम्हाला मिळाले....
पेठे विद्यालयाच्या त्या पवित्र मातीमधूनच.
फळा विरुद्ध स्क्रीन… माहितीचा महासागर की ज्ञानाचा विवेक?
आज वर्गात सर्वत्र Smart Board दिसतो…
आणि विद्यार्थी शिक्षकांना विचारण्याआधीच
Google आणि ChatGPT उघडतात!
माहिती मिळवणं इतकं सोपं कधीच नव्हतं…
पण एक प्रश्न मात्र अधिक कठीण झाला आहे —
ही माहिती ज्ञानात रूपांतरित होते आहे का?
आमच्या पेठे विद्यालयातील — आणि त्या काळातील सर्वच शाळांतील — शिक्षकांनी
आम्हाला फक्त विषय शिकवले नाहीत…
तर माणूस म्हणून घडवलं.
हे काम कुठलीही कृत्रिम बुद्धिमत्ता
कधीच करू शकणार नाही.
आमच्या शिक्षकांचं एक वाक्य आजही कानात घुमतं —
“माहिती ही ज्ञानाची सुरुवात आहे;
पण ज्ञानाची खरी कसोटी विवेकात असते.”
आज एका क्लिकवर माहितीचा अक्षरशः महासागर उपलब्ध आहे…
पण त्या महासागरात उतरणारी अनेक मुलं
दिशाहीनपणे भरकटताना दिसतात.
पूर्वी आम्हाला सांगितलं जायचं —
“पुस्तकात बुडून जा!”
आणि आजचं चित्र काय?
मुलं अक्षरशः स्क्रीनमध्ये बुडालेली दिसतात!
फरक इतकाच —
पूर्वी बुडताना ज्ञान मिळायचं…
आणि आज कधी कधी गोंधळच जास्त मिळतो.
परंपरा आणि प्रगतीचा संगम
मित्रांनो, आपण १९८९ चे “पास आऊट” आहोत…
आपण तो काळ अनुभवला आहे,
जिथे एका खडूच्या छोट्याशा तुकड्याने
आपलं संपूर्ण भविष्य लिहिलं जात होतं.
त्या खडूच्या रेषांमध्ये आपल्या आयुष्याचे मार्ग आखले गेले…
आणि त्या फळ्यासमोर उभ्या असलेल्या गुरुजनांनी
आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला.
म्हणूनच आज ठामपणे सांगावंसं वाटतं —
फळा ही आपल्या शिक्षणाची ‘मुळं’ आहेत…
स्क्रीन ही आजचे ‘पंख’ आहेत…
जे आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी गरजेचे आहेत.
पण एक गोष्ट विसरून चालणार नाही —
पंख उडायला मदत करतात,
पण उभं राहायला मुळंच लागतात!
स्क्रीन माहिती देऊ शकते…
पण शहाणपण देऊ शकत नाही.
ते शहाणपण आजही सापडतं —
आपल्या त्या गुरुजनांच्या साध्या शब्दांत, त्यांनी केलेल्या संस्कारात.
समारोप
आजची पिढी इतिहासातील सर्वात जास्त माहिती असलेली पिढी आहे…
पण तीच पिढी सर्वात जास्त गोंधळलेली होऊ नये,
ही जबाबदारी आपली सर्वांची आहे.
कारण —
फळ्यावरून मिळालेलं ज्ञान आयुष्य घडवतं…
आणि स्क्रीनवरून मिळालेली माहिती आयुष्य सजवते…
पण आयुष्याचा खरा मार्ग —
तो आजही विवेकच दाखवतो!
आणि तो विवेक ना Google वर सापडतो…
ना कोणत्याही Screen वर!
तो घडतो —
आपल्या गुरुजनांच्या व पालकांच्या शब्दांतून,
त्यांच्या संस्कारांतून.
म्हणूनच आज
फळा असो की स्क्रीन —
प्रश्न साधनांचा नाही…
प्रश्न आहे विवेकाने व संस्काराने त्या साधनांचा वापरात आहे.
विवेकाने कोणतीही कृती केल्यास गोंधळ कमी होऊन
प्रत्येकाचा निर्मळ, शुद्ध ज्ञानाच्या दिशेने प्रवास सुकर होईल.