साधारण वयाच्या सोळा ते विसाव्या वर्षांपासून तरुण मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात होते. त्यामध्ये दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू, ड्रग्ज अशी विविध व्यसनं या वयामध्ये मुले करीत असतात. कालांतराने ही व्यसनाची सवय मोठ्या प्रमाणात वाढू लागते. त्याशिवाय मी कामच करू शकत नाही अशी भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. माणूस व्यसनामध्ये गुरफटून जायला लागतो. व्यसन मिळाले नाही तर ती व्यक्ती चिडचिड करण्यास सुरुवात करते. व्यसनी माणसाचा हट्टीपणा वाढायला लागतो. त्याच्या कामावर परिणाम व्हायला सुरुवात होते. खोटे बोलणे सुरू होते. आर्थिक नियोजन कोलमडते. कालांतराने व्यसनामुळे भांडणे व्हायला सुरुवात होते. नवऱ्याच्या व्यसनामुळे स्त्रियांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. कालांतराने कुटुंब उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होते. व्यसन ही वाळवी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जरी लागली तरी सर्व कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. व्यसनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. आळशीपणा वाढायला सुरुवात होते. रात्री उशिरापर्यंत होणारे अल्कोहोलचे व्यसन सकाळी माणसाला आळशी बनवते. विविध प्रकारचे आजार जडायला सुरुवात होते.
आपली भारतीय समाज व्यवस्था ही कुटुंब व्यवस्थेवर आधारलेली आहे. कुटुंब व्यवस्था जेवढी भक्कम तेवढा आपला मानवी समाज स्थिरावलेला असतो. परंतु गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये ही कुटुंब व्यवस्थाच पोखरायला लागलेली आहे. त्याची अनेक कारणे आहेत, जसे की दुसऱ्यांशी बरोबरी करणे, पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण, स्वतंत्र कुटुंब व्यवस्था इ. एकत्र कुटुंब पद्धत हळू हळू लुप्त व्हायला लागली आहे. त्याचे धोके आता लक्षात यायला लागले आहेत.
आज समाजात अनेक घरांमध्ये व्यसन आढळून येते. त्या व्यसनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त होताना आपण बघितले आहेत. कुठे वडिलांचे व्यसन तर कुठे तरुण मुलांचे व्यसन, तर कुठे महिलांचे व्यसन. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
व्यसनातून बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम माझ्यातला 'मी'पणा सोडावा लागतो. 'मला सर्व कळते', 'मी बेवडा आहे पण तेवढा नाही', 'माझ्यामुळे कोणाला त्रास नाही', 'मी माझ्या पैशाने पितो, त्याला काय करायचे आहे', असे अनेक मुद्दे आहेत, त्यांचा सर्वस्वी विचार करून त्यांचा त्याग करावा लागतो. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी अनेक व्यसनमुक्ती केंद्र आहेत, त्यांचा आधार घेता येतो. व्यसन करण्यापूर्वी पोटभर खाल्ले तर व्यसन करण्याची इच्छा कमी होते, तसेच गोड पदार्थ खाल्ल्याने व्यसन करण्याची तीव्रता कमी होते. अनेक जण श्रावण, गणपती, नवरात्री अशा दिवसांमध्ये व्यसन बंद करतात, पण ते संपल्यावर लगेच व्यसनाला सुरुवात करतात. ही गोष्ट स्वतःसाठी व कुटुंबासाठी घातक आहे. ते फक्त शरीराने व्यसनापासून दूर गेलेले असतात, मात्र त्यांचे मन त्या दिवसाची वाट बघत असते. गटारी अमावस्या, रंगपंचमी, ३१ डिसेंबर, ख्रिसमस असे अनेक दिवस म्हणजे व्यसन करायचे असतात, असा गैरसमज आपल्या समाजाने करून घेतला आहे. व्यसन टाळायचे असल्यास या दिवशी व्यसनी लोकांपासून दूर राहून कुटुंबासमवेत वेळ घालवल्यास व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते.
व्यसनमुक्त राहण्यासाठी फक्त 'आजचा दिवस मी व्यसन करणार नाही' ही गोष्ट अमलात आणल्यास व्यसनमुक्ती शक्य आहे. 'नाही' म्हणायला शिकावे, त्यातून व्यसनमुक्त राहण्याची सवय लागते.
पहिला घोट घातक.
अनेक जण बराच काळ व्यसनमुक्त राहतात, पण 'एखाद्या दिवशी घेतली तर काय होते' म्हणून थोडी घेण्यासाठी सुरुवात करतात. त्यानंतर त्यांचे वारंवार व्यसन सुरू होते. कालांतराने त्याचे शरीर दारूशिवाय काम करूच शकत नाही व पुन्हा व्यसनाधीन होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आपण आपल्या व्यसनमुक्त मित्राकडे व्यसन करण्याआधी मदत मागू शकतो. आपल्या मनातील विचारांची देवाणघेवाण केल्यास व्यसनमुक्त राहण्याची ऊर्जा मिळते.
व्यसनमुक्त राहण्यासाठी आपल्या आवडत्या कलेची उपासना करू शकतात.
- सचिन निरंतर (9850719911)