दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले आणि जगभरातलं वातावरण ढवळून निघालं. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येचं रोजचं आयुष्यच बदलून गेलं. पूर्ण जगाच्या उलथापालथ होण्याचा काळ होता हा, ह्या सगळ्यात भरडली जात होती माणुसकी आणि माणसांचा एकमेकांवरचा विश्वास. अशा ह्या अविश्वासाच्या काळात काही माणसांच्या रूपात असलेले देवाचे दूत आपलं काम अतिशय शांतपणे तितकेच नेटाने करत होते. आपल्या असाधारण अशा कृत्यांनी अनेकांना जीवदान देऊन कुठलाही गाजावाजा न करता ते अनाम काळाच्या पडद्याआड गेले, काहींनी केलेल्या अनन्यसाधारण कामगिऱ्या इतिहासाच्या पानांत नोंदल्या गेल्या, तर काही काळाच्या पोटात लुप्त झाल्या.
त्यापैकी काहींची माहिती आपल्याला आहे, काही अनाम आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ऑस्कर शिंडलर हा असाच एक, त्याच्या जीवनावर एक जगप्रसिद्ध चित्रपट, स्टीवन स्पिल्बर्गने बनवलेला "शिंडलर्स लिस्ट" हा चित्रपट बऱ्याच जणांनी बघितला असेल.
ह्या शिंडलर्ससारखेच अनेक लोक होते, त्यापैकी एक होते निकोलस विंटन. त्यांचं ग्रेट ब्रिटनचे शिंडलर असं ज्याचं वर्णन केलं जातं. हे सगळं घडायला कारणीभूत ठरली ती मैत्री, त्यांच्या मित्राचं एक दूरध्वनी संभाषण. त्यांचा मित्र मार्टिन ब्लेक, जो लंडनमधील वेस्टमिन्स्टर स्कूलमधील एक मित्र आणि प्रशिक्षक होता, त्याने विंटनला त्याची नियोजित स्कीइंगची सुट्टी रद्द करून चेकोस्लोव्हाकियाला भेटण्यास सांगितले. ब्रिटनमध्ये शेअर दलाल असलेला तरुण निकोलस स्कीइंग करण्यासाठी स्वीत्झर्लंडमध्ये जाणार होता. डिसेंबर १९३८ मध्ये, जिथे तो चेकोस्लोव्हाकियातील निर्वासितांसाठी ब्रिटिश समितीचा सहकारी म्हणून प्रवास करणार होता. म्युनिक कराराच्या अटींनुसार सुडेटन प्रदेशांच्या जर्मन विलीनीकरणामुळे निर्माण झालेल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी ऑक्टोबर १९३८ मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. युरोपियन युद्ध जवळ येत आहे याची खात्री पटल्याने, विंटनने जाण्याचा निर्णय घेतला. प्रागमध्ये, ब्लेकने विंटनची त्याची सहकारी डोरेन वॉरिनरशी ओळख करून दिली आणि सुडेटनलँडमधील ज्यू आणि राजकीय विरोधकांनी भरलेल्या निर्वासित छावण्यांना भेट देण्याची व्यवस्था केली.
जेव्हा निकोलस प्रागमध्ये पोहोचले आणि लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्यांचं भविष्य अतिशय खडतर आहे. लोकांना त्यांचं मरण डोळ्यासमोर दिसत होतं, पण त्या परिस्थितीतदेखील त्यांच्या मनात विचार होते की आपण मेलो तरी बेहत्तर पण आपल्या मुला-बाळांना तरी वाचवता येईल का?
दुसऱ्या महायुद्धात १९३८-३९ च्या दरम्यान जर्मनीमध्ये ज्यूंवरचे हल्ले दिवसेंदिवस वाढत होते, म्युनिक करारामुळे हिटलरने जर्मन फौजा झेकोस्लावाकियामध्ये घुसवल्या, त्यामुळे त्या वेळच्या झेक राज्याच्या Studiland ह्या भागातील ज्यू-प्रबळ लोकांनी जीवाच्या भीतीने प्रागला जायला सुरुवात केली, आणि प्रागमध्ये शरणार्थींची प्रचंड गर्दी झाली. फार थोड्या सुदैवी लोकांना आपल्या मुलांना ब्रिटनला पाठवण्यात यश आलं. ह्यातल्या बऱ्याच जणांना माहिती होतं की आपला अंत जवळ आला आहे.
मग सुरु झाली निकोलस विंटन ह्यांची धडपड. कुठलीही गोष्ट अशक्य कधीच असू शकत नाही, माहिती नसते ती तुम्हाला ती गोष्ट करण्याची दुसरी पद्धत किंवा दृष्टी. निकोलस विंटन ह्यांचा ह्या गोष्टीवर जबरदस्त विश्वास होता, आणि ह्या विश्वासापोटी सुरु झाली शक्य तितक्या मुलांना झेकोस्लावाकियामधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांची सुरुवात. त्यांनी त्याची सुरुवात केली त्यांच्या पहिल्या वहिल्या प्राग भेटीतच. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्येच ऑफिस थाटलं आणि लोकांची भेट घेण्यास सुरुवात केली, प्रत्येक जण आपापल्या मुलांना झेकोस्लावाकियाच्या बाहेर पाठवण्यास अधीर होता, लोकांची इतकी गर्दी व्हायची की सकाळी सुरु झालेलं हे काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालत असे.
अशा सगळ्यांची माहिती गोळा करून निकोलस परत लंडनला परतले. मुलांच्या वाहतुकीसाठी आणि ब्रिटीश सरकारने मागितलेल्या ५० पौंड प्रति मुल हमीसाठी त्यांनी पैसे उभारले. निर्वासित मुलांची काळजी घेण्यासाठी तयार असलेल्या ब्रिटिश कुटुंबांनाही त्यांना शोधावे लागले. दिवसा, विंटन स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याच्या नियमित नोकरीत काम करत असे आणि नंतर दुपारी आणि संध्याकाळी त्याच्या बचाव कार्यात स्वतःला वाहून घेत असे. शक्य तितक्या मुलांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी त्यांनी पैसे उभारण्यासाठी आणि पालक गृहे शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी सगळ्यांचे दरवाजे ठोठावले, अगदी अमेरिकन राष्ट्रपती रुझवेल्ट ह्यांना देखील पत्र पाठवलं. हे पत्र नंतर जेव्हा निकोलस ह्यांची गोष्ट लोकांना कळली तेव्हा अमेरिकेत ह्या पत्राचा शोध घेतला तेव्हा त्यांना हे पत्र मिळालं. त्यांनी रुझवेल्टना पत्र पाठवलं खरं, पण लंडन मधल्या अमेरिकन वकिलातीचं पत्र आलं की आम्ही ह्या मुलांना आश्रय देण्यास असमर्थ आहोत.
दिवसा आपलं काम आणि संध्याकाळी ब्रिटीश नोकरशाहीस ह्या मुलांना ब्रिटनमध्ये आणण्यासाठी राजी करण्याची अशी दुहेरी धडपड निकोलस ह्यांची सुरु होती. ह्या धडपडीत त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं. ह्यात एकमेव आशेचा किरण म्हणजे ब्रिटनच्या नोकरशहांनी त्यांना सांगितलं की जर ब्रिटीश कुटुंबांनी ह्या मुलांना सामावून घेतलं तर आमची काही हरकत नाही.
म्युनिकनंतर, विंटनला खात्री होती की जर्मन लवकरच उर्वरित बोहेमिया आणि मोराविया ताब्यात घेतील. नोव्हेंबर १९३८ मध्ये क्रिस्टलनाच्ट दंगलीदरम्यान जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील ज्यू समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचारामुळे तो आणखी घाबरला होता. त्यानंतर ब्रिटनमधील ज्यू एजन्सींनी तथाकथित किंडरट्रान्सपोर्टवर जर्मन आणि ऑस्ट्रियन ज्यू मुलांना वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जेव्हा त्याला कळले, तेव्हा विंटनने मार्च १९३९ मध्ये चेकोस्लोवाकियाच्या जर्मन विभाजनामुळे धोक्यात आलेल्या मुलांसाठी अशाच प्रकारची बचाव मोहीम आयोजित करण्यासाठी लोकांच्या एका लहान गटाला बोलावले.
जरी आधी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती आणि बरीच कुटुंबे ह्या मुलांना सामावून घेण्यास तयार होती, तरी जी कागदपत्रं लागणार होती ती देण्याचा वेग अतिशय संथ होता. मग निकोलसनी बनावट कागदपत्रं बनवली आणि पहिली २० मुलं लंडनमध्ये दाखल झाली.
जर्मन लोकांनी चेक भूमीवर कब्जा करण्याच्या आदल्या दिवशी, १४ मार्च १९३९ रोजी, विंटनने आयोजित केलेल्या मुलांची पहिली वाहतूक प्रागहून विमानाने लंडनला गेली. जर्मन लोकांनी बोहेमिया आणि मोराव्हिया या चेक प्रांतांमध्ये एक संरक्षक दल स्थापन केल्यानंतर, विंटनने आणखी सात वाहतूक व्यवस्था केली जी रेल्वेने प्रागहून जर्मनी ओलांडून अटलांटिक किनाऱ्यावर आणि नंतर जहाजाने इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनला गेली. लंडनमधील रेल्वे स्टेशनवर, ब्रिटिश पालक मुलांना घेण्यासाठी वाट पाहत होते. २ ऑगस्ट १९३९ रोजी मुलांची शेवटची ट्रेन प्रागहून निघाली. १९३९ च्या सप्टेंबरच्या सुरुवातीला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि ब्रिटनने जर्मनीमध्ये युद्ध घोषित केले तेव्हा बचाव कार्य थांबले.
युद्ध आणि बाकीचा इतिहास जगाला माहिती आहेच, पण ह्या माणसाचा थोरपणा हा आहे की जवळपास ६७० च्या जवळपास मुलांना त्यांच्या ह्या अथक प्रयत्नांमुळे ब्रिटनला आणता आलं, ह्या माणसाने त्याची पुसटशी वाच्यता कुठेही केली नाही, अगदी आपल्या बायकोला सुद्धा ह्याचा पत्ता नव्हता. एके दिवशी १९८८ मध्ये, म्हणजे जवळपास पन्नास वर्षांनी त्यांच्या पत्नीला घराच्या अडगळीच्या खोलीत विंटन ह्यांची एक वही (स्क्रॅप बुक) सापडली, ज्यात ह्या मुलांची नावं आणि त्यांचे ब्रिटीश पालक ह्यांचे पत्ते होते.
विंटनच्या प्रयत्नातून सुटका करण्यात आलेल्या एकूण मुलांची संख्या अद्याप निश्चित नाही. त्यांनी ठेवलेल्या एका स्क्रॅपबुकनुसार, त्यांनी आयोजित केलेल्या वाहतुकीतून ६६४ मुले ग्रेट ब्रिटनमध्ये आली. २००२ मध्ये चेक टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या "द पॉवर ऑफ गुड: निकोलस विंटन" या माहितीपटासाठी संकलित केलेल्या संशोधनात, संशोधकांनी विंटन-वित्तपुरवठा केलेल्या वाहतुकीतून ब्रिटनमध्ये प्रवेश केलेल्या पाच अतिरिक्त व्यक्तींची ओळख पटवली, ज्यामुळे अधिकृत संख्या ६६९ झाली. उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते की सुटका करण्यात आलेल्या काही मुलांची अद्याप ओळख पटलेली नाही.
तेव्हापासून विंटन यांना इस्रायल राज्याचे माजी अध्यक्ष दिवंगत एझर वेझमन यांचे आभार पत्र मिळाले आणि त्यांना स्वतंत्र चेक प्रजासत्ताकातील प्रागचे मानद नागरिक बनवण्यात आले. २००२ मध्ये, विंटन यांना मानवतेच्या सेवेसाठी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून नाइटहूड ही पदवी मिळाली.