वयाने म्हातारं होणं ही न थांबवता येणारी प्रक्रिया असते.आता तुम्ही-आम्ही सगळे पन्नाशी पार झालो आहोत. काहींना वाटतं की आपण अजून लहान आहोत, म्हातारपण लांब आहे, आपण कधीच म्हातारे होऊ शकत नाही. असले बालिश विचार करणारे अजून पोरकट आहेत हे नक्कीच आणि लवकरच म्हातारपणात प्रवेश करणार हे अटळ. लवकरात-लवकर सत्याचा स्वीकार करून सुदृढ म्हातारपण कसे असेल याचा विचार करा.
शरीराने म्हातारपण ठीक पण मनाने तरुण राहणे ही कला आहे आणि असले कलाकार दुर्मिळ आहेत. तुमचा-आमचा समवयस्क मित्र-मैत्रिणींचा व्हाट्सअँप ग्रुप एकदा अभ्यासा (आम्हाला मैत्रिणी नाहीत कारण आम्ही कधी तरुण नव्हतोच!) . त्यात एकमेकांची उणी-दुणी, खवटपणा, माझीच लालवाले, लोकांची २४x७ शिकवणी घेणारे, तिन्ही त्रिकाळ नकारघंटा बडवणारे, सतत स्वतःची लोकांशी तुलना करणारे, प्रश्नांकित चेहरे घेऊन फिरणारे आणि ओढूनताणून सौजन्याचा आव आणणारे नमुने चिक्कार. ही खवट नमुनेदार प्रजाती मनाने अकाली पिकलेली, भविष्याकडून फार अपेक्षा नसणारी आणि लोकांना लवकरच नकोशी होणारी हे नक्की.
ग्रेसफुल म्हातारपण म्हणजे शरीराने मस्त चालते-फिरते आणि मनाच्या उत्साहाने पळणारे तारुण्य. शरीराने फिट कसे राहायचे याचे ज्ञान सहज उपलब्ध . जिम करा, उत्तम योगा शिकवणारी तरुण शिक्षिका शोधा किंवा जॉगिंग ट्रॅकवर कोणाच्या तरी मागे पळा (पुढे पळायचे वय ओसरलं !), न बुडता स्विमिंग करा, झेपेल एवढं सकस पण कमी खा आणि नीट झोप घ्या (झोपे पूर्वी ‘नीट’ टाळा!), गणित तसं सोपं.
मनाला सदाबहार तरुण ठेवणे अवघड आणि आपण मनाने म्हातारे झालो हे समजणे त्यापेक्षा अवघड. एकदा आरशा समोर उभे राहून स्वतःला प्रश्न विचारा - पोरंबाळं आपल्याला टाळतात का ? बायको तोंडदेखलं ‘हो’ म्हणून तिला पाहीजे तेच करते का? आपण घरात नसलो तर कुटुंब जास्त खुश असतं का? तुम्ही घरात असताना कामवाल्या बाईच्या कपाळावर आठ्या पडतात का? पोरांचे मित्र-मैत्रिणी तुम्हाला कोणत्या टोपण नावाने हाक मारतात? ऑफिसमध्ये आपण डबा एकटेच खातो का? लोक आपल्याला जरुरी एवढीच माहिती देतात का? ऑफिस मधल्या किंवा घरगुती समारंभात आपल्याला आमंत्रण देणे चुकून विसरल्या सारखे करून मुद्दाम टाळले जाते का? आपण तेच-तेच विषय तुटेपर्यंत ताणतो का ? व्हाट्सअँप ग्रुप मधून आपण एक्सिट झालो तर ५० अंगठे आणि ५१ लव येतात का ? उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही ‘गॉन केस’ आहात, स्वतःला सुधारायला आणि आवरायला आत्ताच शिका किंवा उरलेल्या आयुष्याचा कचरा करायला तयार रहा.
म्हणजे काय करायचे? फार काही नाही - बायका पोरांचे मित्र व्हा. नसलेला शहाणपणा जगाला दाखवायला जाऊ नका. कोणी मागितला नाही तर उगीच सल्ला देऊ नका. भूतकाळाचे दाखले देऊन आपण किती सोसले याचे सुस्कारे टाळा. आयुष्यातून विरक्त होऊन लोकांना त्रास होईल एवढा अति देवधर्म करू नका. तत्व , संस्कृती , नितिमत्ता याचे दाखले देऊन बौद्धिक ओकाऱ्या करू नका. वयाचे पन्नास झाले तरी पोटापाण्यासाठी कामधंदे उत्साहाने आणि व्यवस्थित करा. प्रमोशन, मोठ्या पोस्टची, किंवा स्व:उन्नतीची मोठी स्वप्ने पहा त्यासाठी अपार कष्ट करा. नव्या टेकनॉलॉजि शिका, तरुणांत मिसळा आणि त्यांना आपलेसे करा. थोडे हसा, लोकांना हसवण्याचा प्रयत्न करा, जिंदादिल रहा आणि मानसिक बद्धकोष्ठतेतून मुक्त व्हा.
आमचा एक डॉक्टर मित्र सांगतो मानसिक आणि शारीरिक रिकामपण वाईट. म्हणजे तुम्ही तुमच्या हातातली कामधंदे सोडून आराम करायला घरी बसलात तर लवकरच तुमचे हात-पाय बसून तुम्ही उचलले जाण्याची शक्यता जास्त. पटण्यासारखं आहे, तो नेहमीच अशा केसेस बघत असेल. हातात स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या गुंतवून ठेवणारा प्लॅन-बी नसेल तर फक्त कंटाळा आला, आता आराम करायचा या सबबीवर हातातल्या कामातून रिटायर्ड होणं फार शहाणपणाचं नाही. कर्म करत रहा, त्यासाठी राजकारण्यांचा आदर्श आणि उत्साह घ्या, ऐंशी पार झाले तरी गुलाबी स्वप्न बघत राहा. कामात नसाल तर कामातून जाल हा मंत्र लक्षात ठेवा. आमचा एक ज्योतिषी मित्र सांगतो, प्रत्येकाला सुदृढ जगण्यासाठी एक व्यसन पाहिजे. व्यसनाला पैसा, प्रतिष्ठा, छंद काहीही चालेल. पण त्या व्यसनाचे पॅशन पाहीजे म्हणजे म्हातारपण आनंदात जाते. हे पण बरोबरच.
भो या सगळ्याचा मतितार्थ इतकाच - आपण सगळे वारकरी आहोत. कर्माचा टाळ आणि मानसिक संतुलनाच्या चिपळ्या वाजवत आनंदाने आणि धडधाकटपणे पंढरीकडे धावत राहा. मध्येच गाड्याचं चाक आपल्याच हाताने पंचर केले तर जवळच्या गटार गंगेत विसर्जन नक्की. तुम्ही समजदार आहात. निर्णय तुमचा. बाकी फुकटचे सल्ले देण्याची वेळ आणि शब्दमर्यादा आता संपली आहे. नेहमी सारखेच, जय हो!
वय वाढत जाओ
मन चिरतरुण राहो
उत्कट सकारात्मतेत
उरले आयुष्य वहावो !!